अवास्तव कागदपत्रांच्या मागणीमुळे जनता मेटाकुटीस, आपची पत्रकार परिषद
बेळगाव : बेळगावमध्ये सुपरस्पेशालिटी सरकारी हॉस्पिटल सुरू झाले. परंतु, नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यात ते अपयशी ठरले आहे. यातील अनेक विभागांमध्ये डॉक्टर्स कार्यरत नाहीत. तर एका विभागाचा दुसऱ्या विभागासोबत समन्वयाचा अभाव असल्यामुळे नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित रहात असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे प्रदेश सदस्य गुंडप्पन्नावर यांनी केला. शुक्रवारी कन्नड साहित्य भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी बेळगाव शहरातील अनेक समस्यांबाबत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. बुडा बेळगाव शहराच्या विकासात पूर्णपणे फोल ठरली आहे.
मागील अठरा वर्षांपासून एकही नवीन लेआऊट अंतर्गत विकसित झालेला नाही. मालमत्तांचे दर मात्र कमालीचे वाढविण्यात आले. साधा 30×40 च्या भूखंडाची किंमत शहरात 50 ते 60 लाखांवर पोहोचली असल्याने सर्वसामान्य व्यक्ती कसे काय आपले घरकुल उभे करू शकतो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ई-आस्थी नोंदणीमध्ये अवास्तव कागदपत्रांची मागणी केली जात असल्याने ही प्रक्रिया रखडली जात आहे. ई-आस्थीमुळे भ्रष्टाचाराचे नवे द्वार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खुले झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. पुढील वर्षी प्रत्येक साखर कारखान्यातील काटामारीविरोधात आम आदमी पार्टी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय पाटील, शंकर हेगडे, अब्दुल शेख यांच्यासह आपचे पदाधिकारी उपस्थित होते.









