बेळगाव : युवजन क्रीडा खाते व महिला सबलीकरण यांच्यावतीने म्हैसूर दसरा महोत्सवाचे औचित्य साधून बेळगाव विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत बेळगावच्या डीवायईएस संघाने शिर्शी जिल्हा संघाचा 3-0 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. जिल्हा क्रीडांगणावरती आयोजित करण्यात आलेल्या दसरा विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजू सेठ, युवजन क्रीडा अधिकारी बी. श्रीनिवास यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत विभागीय स्तरावरील 14 महिला व पुरुष संघांनी भाग घेतला होता. पुरुष विभागातील पहिल्या उपांत्य सामन्यात बेळगाव संघाने बागलकोटचा 25-18, 25-19, 25-13 तर दुसऱ्या उपांत्य लढतीत शिरसी संघाने हावेरी संघाचा 25-21, 24-26, 25-18, 25-22 अशा सेटमध्ये पराभव करून अंतिमफेरीत प्रवेश केला.
अंतिम फेरीत बेळगाव संघाने शिरसीचा 25-15, 25-22, 25-20 अशा सरळसेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. महिलांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात धारवाडने गदग संघाचा 3-0 तर बेळगावने विजापूरचा 3-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत धारवाडने बेळगावचा 25-18, 25-22, 20-25, 25-21 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. बऱ्याच वर्षानंतर डीवायईएस संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या संघात स्वप्नील वराटे, भीमराई चिपाडी, मोहम्मद काजी, अमन काजी, शुभम आनंद, विपूल रै, योगेश गौडा, प्रज्वल मजुकर, समर्थ शेलार, चक्रवर्ती, विनोद एस., शरद गौडा आदी खेळाडूंचा समावेश असून संघाचे प्रमुख प्रशिक्षक बसवराज होसमठ, हर्षवर्धन सिंगाडे, नामदेव मिरजकर तर संघव्यवस्थापक संतोष चिपाडी आदी होते.









