क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
शिमोगा येथील आनंदपुरा येथील 13 व्या सह्याद्री सबज्युनिअर, 39 व्या कर्नाटक ज्युनिअर व सिनियर ज्युडो स्पर्धेत बेळगावच्या डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेलच्या ज्युडोपटूनी 28 सुवर्ण, 15 रौप्य व 16 कांस्य पदकासह घवघवीत यश संपादन करीत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.
सुवर्णपदक विजेत्या सर्व ज्युडोपटूंची झारखंड व तमिळनाडू येथे होणाऱया राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत बेळगावच्या डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेल बेळगावच्या सर्व ज्युडोपटूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये 28 सुवर्ण, 15 रौप्य व 16 कांस्यपदकांची कमाई करताना सर्वसाधारण विजेतेपदही पटकाविले. विजेत्या बेळगाव संघाला प्रमुख पाहुणे श्री. श्री. डॉ. मल्लिकार्जुन मुरगेंद्रस्वामी यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रशिक्षिका रोहिणी पाटील, देवेश्री विक्रमसिंग कदम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व ज्युडोपटूंना ज्युडो प्रशिक्षिका रोहिणी पाटील, कुतूजा मुलतानी यांचे मार्गदर्शन लाभले असून युवजन क्रीडा अधिकारी जिनेश्वर पडनाड यांचे प्रोत्साहन लाभले.









