अध्याय अकरावा
बाप्पा म्हणाले, ओम, तत, सत अशी ब्रह्माची तीन नावे श्रुतिनी सांगितली आहेत. ओंकाराचा उच्चार अत्यंत पवित्र आहे म्हणून त्याचा उच्चार करून केलेली कर्मे ईश्वराला अर्पण करावीत. म्हणजे माणसाचा मी कर्ता आहे असा समज आणि त्यामुळे झालेला अहंकार व फलेच्छा नाहीशा होतात. ईश्वरानं दिलेलं कर्म, त्याच्या प्रेरणेनुसार करून त्यालाच अर्पण केलं की, मनुष्य निर्लेप होतो व केलेलं कर्मही निर्दोष होतं. तत नावाचा उच्चार करून कर्मे निरपेक्षपणे ईश्वराला अर्पण केली की, कर्मातील दोष दूर होतात व कर्म ब्रह्मस्वरूप किंवा ब्रह्मार्पण होते. जर कुणाला सद्भावनेने यज्ञ, तप, दान करायचे असेल तर ते सत या नामाचा उच्चार करून केले असता ब्रह्मार्पण होते. थोडक्यात ओम, तत, सत या नामांचा उच्चार करून, निरपेक्षतेने किंवा उदात्त हेतूने केलेले कर्म ब्रम्हार्पण होते. ब्रम्हाचे तीन प्रकार सांगून झाल्यावर बाप्पा समाजाचे व्यवसायानुसार विभाग कसे होतात ते पुढील श्लोकात सांगत आहेत.
ब्रह्मक्षत्रियविट्शूद्राऽ स्वभावाद्भिन्नकर्मिणऽ ।
तानि तेषां तु कर्माणि संक्षेपात्तेऽ धुना वदे ।। 27।।
अर्थ-ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे स्वभावत: भिन्नकर्मी आहेत. त्यांची कर्मे तुला आता संक्षेपाने सांगतो.
विवरण- ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे व्यवसायानुरूप समाजाचे विभाग आहेत. जो जसा व्यवसाय करेल, त्याचं वर्गीकरण त्या विभागात होतं अशी कल्पना आहे. यात जातीचा उल्लेख कुठंही नाही कारण भगवंतांना सर्व माणसे सारखीच आहेत पण कालांतराने मनुष्य करत असलेला व्यवसाय हीच त्याची जात बनली. पुढील श्लोकात बाप्पा ब्राह्मण समाजाची कर्तव्ये सांगत आहेत.
अन्तर्बाह्येन्द्रियाणां च वश्यत्वमार्जवं क्षमा ।
नानातपांसि शौचं च द्विविधं ज्ञानमात्मनऽ ।। 28 ।।
वेदशास्त्रपुराणानां स्मृतीनां ज्ञानमेव च ।
अनुष्ठानं तदर्थानां कर्म ब्राह्ममुदाहृतम् ।। 29 ।।
अर्थ-आंतर व बाह्य इंद्रिये ताब्यात असणे, सरळपणा, क्षमा, नानाप्रकारची तपे, आंतर व बाह्य, दोन्ही प्रकारची शुद्धता, आत्माविषयक ज्ञान, वेदशास्त्रs-पुराणे-स्मृति यांचे ज्ञान व त्यांनी प्रतिपादित केलेल्या गोष्टी करणे हे ब्राह्मण समाजाचे कर्म होय.
विवरण-पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये अशी दहा इंद्रिये व अकरावे मन यांना ताब्यात ठेवणे हे ब्राह्मण व्यक्तीचे कर्तव्य आहे. ते जर शक्य झाले तरच वरील श्लोकात सांगितलेली ब्राह्मण या वर्णाची कामे मनुष्य करू शकतो. पुढील श्लोकात बाप्पा क्षत्रिय या वर्णाची कर्मे सांगत आहेत
दार्ढ्यां शौर्यं च दाक्ष्यं च युद्धे पृष्ठाप्रदर्शनम् ।
शरण्यपालनं दानं धृतिस्तेजऽ स्वभावजम् ।। 30 ।।
प्रभुता मन औन्नत्यं सुनीतिर्लोकपालनम् ।
पञ्चकर्माधिकारित्वं क्षात्रं कर्म समीरितम् ।। 31 ।।
अर्थ-दृढपणा, शौर्य, दक्षता, युद्धामध्ये पाठ न दाखविणे, शरणागताचे पालन करणे, दान, धैर्य, स्वाभाविक तेज, प्रभुत्व, मनाचा मोठेपणा, उत्तम राजकारण, लोकपालन, अध्ययन, अध्यापन, यजन, याजन् आणि दान या पाच कर्माचा अधिकार असणे याला क्षत्रियाचे कर्म म्हंटले आहे. वैश्यांच्या कर्माबद्दल बोलताना बाप्पा म्हणाले,
नानावस्तुक्रयो भूमेऽ कर्षणं रक्षणं गवाम् ।
त्रिधा कर्माधिकारित्वं वैश्यकर्म समीरितम् ।।32।।
विवरण- नाना वस्तूंची खरेदी, शेतकी, गोरक्षण, यज्ञ, वेदाध्ययन आणि दान या तीन कर्माचा अधिकार असणे याला वैश्यांचे कर्म म्हटले आहे. शूद्रांच्या कर्माबद्दल बाप्पा असं सांगतात,
दानं द्विजानां शुश्रूषा सर्वदा शिवसेवनम् ।
एतादृशं नरव्याघ्र कर्म शौद्रमुदीरितम् ।। 33 ।।
अर्थ-दान, द्विजांची शुश्रूषा, सर्वदा शिवाची सेवा अशा प्रकारच्या कर्माला, हे नरश्रेष्ठा, शूद्राचे कर्म म्हंटले आहे.








