आशियाई क्रीडा स्पर्धेआधी भारताला मोठा धक्का : बाजू मांडण्यासाठी 21 दिवसांची मुदत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची स्टार महिला धावपटू दुती चंद डोपिंगच्या जाळ्यात अडकली आहे. प्रतिबंधित पदार्थांच्या सेवनामुळे तिच्यावर चार वर्ष निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दुतीच्या डोपिंग टेस्टमध्ये सिलेक्टिव एंड्रोजन रिसेप्टर मॉड्यूलेटर (एARश्) हा प्रतिबंधित पदार्थ आढळला होता. त्यानंतर तिचे तात्पुरतं निलंबन करण्यात आले होते. आता तिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तिच्या बंदीचा कालावधी 3 जानेवारी 2023 पासून लागू होईल. यामुळे आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत तिला सहभागी होता येणार नाही. याशिवाय, दुती नॅशनल रेकॉर्ड होल्डर असल्याने आशियाई स्पर्धेत भारताला एका पदाला मुकावे लागणार आहे.
नाडा (नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी) च्या अधिकाऱ्यांनी गतवर्षी 5 व 26 डिसेंबर रोजी डोपिंग चाचणीसाठी दुतीचे नमुने घेतले होते. यावेळी तिच्या पहिल्या नमुन्यात अँडारिन, ऑस्टारिन आणि लिंगंड्रोल आढळले. यानंतर दुसऱ्या नमुन्यात अँडारिन आणि ऑस्टारिन हे प्रतिबंधित पदार्थ आढळले आहेत. दुतीला बी नमुना चाचणी देण्याची संधी होती. त्यासाठी तिला सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र दुतीने तसे केले नाही. जानेवारी 2023 मध्ये दुती चंदवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यानंतर सात महिने झालेल्या सुनावणीनंतर दुतीवर डोपिंगमध्ये दोषी आढळल्या प्रकरणी चार वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी 3 जानेवारी 2023 पासून लागू होईल.
बाजू मांडण्यासाठी 21 दिवसांची मुदत
डोपिंग विरोधी अपील पॅनेलच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्यासाठी दुतीकडे आता 21 दिवसांचा अवधी आहे. यात जर ती यशस्वी झाली तर तिच्यावरील चार वर्षाची बंदी हटवली जाऊ शकते. मात्र, सध्या तरी ते कठीण आहे. दुतीवरील चार वर्षाची बंदी म्हणजे तिची कारकीर्द जवळपास संपल्यात जमा अशा स्वरुपाची आहे. दुती सध्या 27 वर्षाची आहे. बंदी संपेपर्यंत ती 31 वर्षांची असेल. अशा स्थितीत तिला पुनरागमन करणे सोपे जाणार नाही. आता ती आशियाई खेळातून बाहेर आहे, आता पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जाण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.
100 व 200 मी शर्यतीत सहभागी होणाऱ्या दुतीने आजवर शानदार कामगिरी करताना पदके जिंकली आहेत. याशिवाय, 100 मीटरमध्ये तिच्या नावावर राष्ट्रीय विक्रम आहे. आता चार वर्षाची बंदीची शिक्षा झाल्यामुळे तिची कारकिर्द संपल्यात जमा असल्याचे सध्या तरी चित्र आहे.









