केंद्राकडून ऐन दिवाळीत पद कपातीचा बाण सुटला; आरोग्य विभागाला दिलेल्या आदेशामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी कडू
रत्नागिरी प्रतिनिधी
केंद्र शासनाने ऐन दिवाळीत राष्ट्रीय आरोग्य अभियानातील राज्यातील तब्बल 597 नर्सेसची नोकरी 31 ऑक्टोबरपासून थांबवण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिले आहेत. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील 19 नर्सेसची सेवा या आदेशामुळे समाप्त होणार आहे. ऐन दिवाळीत या महिलांची नोकरी केंद्र शासनाकडून हिसकावून घेण्यात येऊन त्यांची दिवाळी गोड करण्याऐवजी कडू केली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियांनातर्गंत सध्या बिगर आदिवासी क्षेत्रात 3207 एएनएम पदे सन 2022-23 मध्ये प्रस्तावित करण्यात आली होती. त्याबाबतचा महाराष्ट्राच्या आरोग्य सेवा आयुक्तस्तरावरून तेवढीच पदे प्रस्तावित करणारा अंमलबजावणीचा आराखडा मंजूरीसाठी केंद्राकडे पाठवला होता. त्यातील 2 हजार 610 पदे मंजूरी मिळालेली होती. त्यानुसार नर्सेसना आरोग्य विभागाकडून नियुक्त्याही देण्यात आलेल्या होत्या. पण आता मागील वर्षात एकही बाळंतपण न झालेल्या उपकेंद्रातील परिचारिका पदे रद्द करावीत. ज्यांचे काम असमाधानकारक आहे, अशांना कमी करावे. ज्यांची सेवा कमी झालेली आहे, (सेवा ज्येष्ठतेनुसार) त्यांना कमी करावे असे आदेशात म्हटले आहे.
मागील वर्षीही परिचारिका सेवा समाप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली होती. परंतु अचानक दिलेले आदेश रद्द करून त्यांची सेवा समाप्त करून नये असे नव्याने आदेश काढण्यात आलेले होते. पण आता यावर्षी देखील केंद्राकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तब्बल 597 नर्सेसची नोकरी 31 ऑक्टोबरपासून समाप्तीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिले आहेत. त्यामुळे या अभियानातील नर्सेस ऐन दिवाळीत संकटात पडल्या आहेत. राज्यात या अभियानांतर्गंत 2610 पदांना मंजूरी लाभलेली होती. पण आता 597 पदे समाप्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियांनातर्गंत 2022-23 अंतर्गंत 101 एएनएम ची पदे मंजूरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. त्यापैकी 82 पदांना मंजूरी देण्यात आलेली होती. या नियुक्ती दिलेल्या पदांपैकी आता केंद्राकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील 19 एएनएम ची सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आल्याने या नर्सेस कर्मचाऱ्यांमध्ये ऐन दिवाळीत घोर निराशा पसरली आहे.