बाळेकुंद्री खुर्द, कणबर्गी, मुचंडी, अष्टे, सुळेभावी परिसरात भाजीपाला पिकांचे पावसामुळे नुकसान
वार्ताहर/सांबरा
तालुक्याच्या पूर्वभागामध्ये धूळवाफ पेरण्या जोरात सुरू आहेत. त्यामुळे शिवारात सर्वत्र बैलजोड्या, ट्रॅक्टर व शेतकरी वर्ग पहावयास मिळत आहेत. पूर्वभागातील बसवण कुडची, निलजी, शिंदोळी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, कणबर्गी, मुचंडी, अष्टे, मोदगा, सुळेभावी आदि परिसरामध्ये वळिवाने अनेकदा हजेरी लावली आहे. या भागात अधूनमधून पाऊस होतच होता. त्यामुळे जमिनीमध्ये ओलावा निर्माण होऊन पूर्व मशागतीची कामे खोळंबली होती. मागील आठ दहा दिवसापासून या भागामध्ये पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे सध्या पेरणीची कामे जोरात सुरू आहेत.
कोथिंबीरचा दर वाढला
या भागात मिरची, कोथिंबीर, मेथी, शेपू, वांगी, काकडी आदी पिकेही मोठ्या प्रमाणावर पिकविण्यात येतात. मात्र मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले. सध्या इतर पिकांच्या तुलनेत कोथिंबीरचा दर वाढला आहे. पाऊस लांबल्यास पुन्हा दरवाढ होण्याची शक्यता आहे
पूर्वभागात पावसाची हजेरी
तालुक्याच्या पूर्वभागामध्ये मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. आगाऊ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागून आहेत. बुधवारी दुपारी बसवन कुडची, निलजी, मुतगे, सांबरा, बाळकुंद्री खुर्द गावामध्ये पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.









