रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी
वार्ताहर/जांबोटी
बैलूर-कुसमळी संपर्क रस्त्याची दुर्दशा झाली असून खराब रस्त्यामुळे दोन्ही गावच्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सदर रस्त्याचे त्वरित खडीकरण, डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. बैलूर मुख्य रस्त्यापासून ते कुसमळी गावापर्यंतच्या संपर्क रस्त्याचे अंतर सुमारे चार किलोमीटर आहे. सुमारे 15 वर्षांपूर्वी जिल्हा पंचायतीमार्फत या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर या रस्त्याच्या देखभालीकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे सद्यस्थितीमध्ये या रस्त्याची पार दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर डांबर नावाला शिल्लक नाही. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे वाहनधारकांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे पावसाळ्dयात या रस्त्यावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
संपर्क रस्त्यासाठी जवळचा रस्ता
वास्तविक कुसमळी गावच्या नागरिकांची बैलूर येथे ग्राम पंचायत तसेच इतर शासकीय कामांसाठी नेहमी ये-जा सुरू असते. तसेच बैलूर, मोरब, गावाच्या ग्रामस्थांना देखील जांबोटी, खानापूर आदी ठिकाणी संपर्क साधण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे. या दोन्ही गावच्या नागरिकांना हा रस्ता सोयीस्कर असला तरी रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच बैलूर गावाला जोडणारे हब्बनहट्टी फाटा ते बैलूर तसेच बेळगाव-चोर्ला मुख्य रस्त्यापासून ते बैलूर गावापर्यंतच्या दोन्ही संपर्क रस्त्यांची अवस्था देखील दयनीय बनली आहे.
त्वरित डांबरीकरणाची गरज
तरी आमदार विठ्ठल हलगेकर व खानापूर उपविभागाच्या जिल्हा पंचायत सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी लक्ष घालावे. तसेच पावसाळ्dयापूर्वी बैलूर-कुसमळी संपर्क रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध करून रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.तसेच रस्ता त्वरित डांबरीकरण करण्याची गरज आहे.









