► प्रतिनिधी / बेळगाव
एलअँडटी कंपनीकडून 24 तास पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनी घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र या कामामुळे खड्डे, चिखल आणि धुळीचे साम्राज्य निर्माण होऊ लागले आहे. गोंधळी गल्लीत जलवाहिनीच्या खोदाईमुळे धूळधाण झाली आहे.
गोंधळी गल्लीत 24 तास पाणीपुरवठ्यासाठी खोदाई सुरू झाली आहे. दरम्यान पूर्वीच्या जलवाहिनी फुटल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. विशेषत: जलवाहिनींना गळती लागून पाणी वाया जाऊ लागले आहे. परिणामी गल्लीत चिखल आणि धुळीच्या समस्येला सामोरे जावे लागले आहे. एकीकडे नवीन जलवाहिन्या घातल्या जात आहेत. मात्र दुसरीकडे या जलवाहिन्या घालताना जुन्या जलवाहिन्यांना गळती लागू लागली आहे.
घरोघरी घालण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या कामामुळे दैनंदिन पाणीपुरवठा ठप्प होऊ लागला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना धुळीच्या समस्येबरोबर पाण्याची समस्याही निर्माण होऊ लागली आहे.









