मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या दसरा मेळावा हा ‘डुप्लिकेट’ असून तो केवळ ‘भाजपमधील डुप्लिकेट लोकांना’च मान्य आहे अशी जोरदार टिका खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली आहे. तसेच ठाकरेंचा दसरा मेळावा हा 2024 मध्ये राज्यात आणि राष्ट्रीय स्तरावर “परिवर्तनाची सुरुवात” असेल असा दावाही संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
पत्रकारांशी बोलताना, खासदार संजय राऊत म्हणाले, “मुंबईतील शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही एक परंपरा आहे. या मेळाव्याला पाच दशकांहून अधिक काळाचा वारसा आहे. दसरा मेळाव्यातून महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी केवळ ठाकरे हेच व्हिजन आणि रोड मॅप देऊ शकतात.” असे त्यांनी म्हटले आहे.
यांनी पुढे बोलताना ते म्हणाले की, “शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण 2024 मध्ये राज्यात आणि राष्ट्रीय स्तरावर “परिवर्तनाची सुरुवात” असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या दसरा मेळावा ‘डुप्लिकेट’ आहे. आणि तो केवळ ‘भाजपमधील डुप्लिकेट लोकांना’च मान्य आहे.” असा दावाही त्यांनी केला.
शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ठाकरे हे मंगळवारी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर आपला दसरा मेळावा आयोजित केला आहे.
पुढील वर्षी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आहेत. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात काय भूमिका घेतात हे जाणून घेण्यासाठी भाजप नेते उत्सुक असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच अमली पदार्थ प्रकरणातील आरोपी ललित पाटील हा कधीच शिवसेनेचा पदाधिकारी नव्हता, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला ललित पाटील हे शिवसेना नाशिकचे प्रमुख होते या आरोपावर बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे गृहखात्यावर नियंत्रण नाही तसेच ते एक “अयशस्वी गृहमंत्री” आहेत. असा दावाही त्यांनी केला.