वार्ताहर/उचगाव
येथील देवस्की पंचकमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने दसरा महोत्सवानिमित्त ग्रामदेवता सुरवीर मंदिराचा पालखी सोहळा गुरुवार दि. 2 ऑक्टोबर रोजी ढोल ताशाच्या गजरात, भक्तीमय वातावरण आणि हर हर महादेवच्या जयघोषात असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडला. सदर पालखी सोहळ्याला एक वाजता शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्यामध्ये गावातील भाविकांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली होती.गुरुवारी दुपारी बारा वाजता उचगाव मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणातील बाळासाहेब देसाई सरकार यांच्या वाड्यामध्ये सर्व भाविकांसह ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यानंतर पालखीची यथासांग पूजा करून पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला.
हर हर महादेवच्या गजरामध्ये देसाईवाड्यातून गांधी चौक, गणपत गल्लीतील सीमेवरती जाऊन पुन्हा परतीच्या वाटेने सूरवीर मंदिरामध्ये जाऊन या ठिकाणी पूजा, श्रीफळ ग्रा.पं. अध्यक्षा मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे यांच्या हस्ते वाढविण्यात आला. त्यानंतर कचेरी गल्लीमार्गे पुन्हा गणपती गल्लीमध्ये येऊन मळेकरणी आमराई आणि भैरवनाथ मंदिर या परिसरात परंपरेनुसार हा पालखी सोहळा पार पडला. परंपरेनुसार दसरा साजरा करून सदर पालखी गावामध्ये मार्गस्थ होऊन देसाई वाड्यामध्ये सोहळ्याची सांगता करण्यात आली. या सोहळ्यामध्ये काडाचे अध्यक्ष युवराज कदम, देवस्की पंचकमिटीचे संभाजी कदम, रामा कदम, बाळासाहेब देसाई, नारायण गडकरी, अशोक हुक्केरीकर, लक्ष्मण होनगेकर, बंडू पाटील, मनोहर कदम, माणिक होनगेकर यासह ग्रामस्थ उपस्थित होते.









