गृहप्रकल्प, वाहनउद्योग, सोने, इलेक्ट्रॉनिक्स, किराणा आणि कपडे व्यावसायवृध्दीची आस : ऑनलाईन खरेदीचे स्थानिक व्यापाऱ्यांपुढे आव्हान
संतोष पाटील/कोल्हापूर
मागील तीन वर्षात कोरोना आणि त्यानंतर दोन महापुरांमुळे जिह्यातील व्यापार-व्यवसायाला आलेली मरगळ आता दसरा-दिवाळी निमित्ताने दूर होईल अशी आस व्यावसायिकांना आहे. जिह्यात पुढील महिन्याभरात किमान 1200 कोटी रुपयांची अतिरिक्त उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक बाजारपेठेला ऑनलाईन खरेदीचे मोठे आव्हान असले तरी वाहनखरेदी गृहप्रकल्प, सोने खरेदी, किराणा आणि कपडे व्यवसायिकांना पुढील काही महिन्यात व्यावसायवृध्दी होईल, असे तज्ञ सांगतात. गणेश उत्सव धुमधडाक्यात साजरा झाला. दस्रयानिमित्ताने बाजारपेठा सजल्या आहेत. पुढील महिन्याभरातील महाउत्सवातील मुहूर्त कॅश करण्यानिमित्ताने ग्राहकाची पावले आतापासूनच बाजारापेठेकडे वळत असल्याचे शुभवर्तमान आहे.
मागील तीन वर्षात बाजारपेठेवर कोरोना-महापुराचे सावट होते. त्यामुळे उलाढाल जवळजवळ ठप्प झाली होती. आता कोरोना संसर्ग संपल्यात जमा आहे. दोन वर्षात उद्योग व्यवसायाची चाके फिरु लागल्याने लोकांची क्रयशक्ती वाढली आहे. दोन अडीच वर्षातील बाजारातील मरगळ दूर होत असल्याचे गणेशोत्सवात दिसले.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापारीवर्गाने वेगवेगळ्या सवलतींच्या योजना देऊ केल्या आहेत. केवळ दसराच नव्हे तर दिवाळी व लग्नग्नसराईसाठी देखील आतापासूनच खरेदीची सुरूवात होईल. एलईडी टीव्ही, फ्रीज, वातानुकूलित यंत्र, ओव्हन, सीडी, एलसीडी, संगणक यासारख्या वस्तू खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. वाहनांची आगाऊ नोंदणी मोठय़ा संख्येने होत आहे. कागदपत्रांची पूर्तता करून ही वाहने दसऱयाला घरी नेली जातील. कापड मार्केटही चांगलेच तेजीत आले आहे. बाजारातही आकर्षक योजनांव्दारे ग्राहकांना आकर्षीक केले जात आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी झीरो डाउन पेमेंट, ईएमआय, शून्य टक्के व्याजासह कर्ज आदी सुविधाही देण्यात आल्या आहेत. मोठी मल्टिपल शोरूम आणि ईकॉमर्स ऑनलाईन खरेदीचे मोठे आव्हान स्थानिक व्यावसायिकांना आहेत. लक्ष्मीपूरी, राजारामपूरी, शाहूपूरी, स्टेशन रोड, गुजरी, महाव्दार रोड आदी नेहमीची बाजारपेठ सणासुदीसाठी सज्ज असतानाच शहरातील विविध मॉलमध्येदेखील आकर्षक सवलती उपलब्ध आहेत. दसऱयाला ग्राहक गृहखरेदीला प्राधान्य देण्याची शक्यता गृहीत धरून बांधकाम व्यावसायिकांनीही गृहखरेदीवर आकर्षक सवलत देऊ केली आहे.
लगबग वाढली
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱयाच्या दिवशी ग्राहक नवनवीन वस्तुंची खरेदी करतात. कोरोना आणि महापुरांचे लग्नग्नसराईवर सावट होते. कोरोनाकाळात जी काही लग्ने झाली ती मोजक्यांच्या उपस्थितीत साधेपणाने झाली. आता गेल्या सहा महिन्यात योजलेले खरेदीचे बेत आता दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने पूर्ण केले जाणार आहेत. दिवाळीनंतर लग्नग्नसराई सुरू होणार असल्याने सोने बाजारातील उलाढालही वाढण्याची शक्यता आहे. सणानिमित्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल आणि कपडे खरेदी मोठय़ा प्रमाणात होणार असल्याने व्यावसायिकांनी खास ऑफर्स देऊ केल्या आहेत. मिठाईची खरेदी मोठय़ा प्रमाणात होत असल्याने अनेक महिन्यानंतर या दुकानात मोठी लगबग दिसत आहे. किराणामाल व्यवसायातही यानिमित्ताने मोठी उलाढाल होईल.
देशात 25 टन सोने खरेदी-विक्री शक्य
विजयादशमीच्या मुहूर्तावर शहरवासीयांनी अस्सल सोने तर लुटतीलच; शिवाय 800 कार आणि दहा हजारच्या आसपास मोटारसायकलींची खरेदी होईल. देशात यामुहूर्तावर सुमारे 25 टन सोने खरेदी केले जाईल असा अंदाज आहे. शेअर बाजारातील चढउतारीमुळे यंदाच्या वर्षी सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसतोय. नवरात्रोत्सवापासून सुरू झालेल्या उत्सवपर्वात वाहन विक्रीने टॉप गियर टाकल्याचे वितरकांनी सांगितले. सराफी पेढय़ांतील उत्साह वाढला आहे. सोन्याचा भाव 27 हजारांच्या आसपास प्रतिदहा ग्रॅमवरुन 50 हजारांवर स्थिरावला. मागील दोन वर्षापासून सोने दर स्थिर आहे. सोने 50 हजारांवर स्थिरावले असले तरी गुंतवणूक आणि लग्नसराईतील सोन्याचे स्थान अढळ आहे. वळे, बिस्कीट, नाणे, दागिने यांची खरेदी मोठय़ा प्रमाणावर होईल असा अंदाज आहे.
रिअल इस्टेटमध्येही पुन्हा तेजीचे तोरण या मुहूर्ताच्या निमित्ताने बांधले गेले असून, किमान 125 फ्लॅटची नोदणी उत्सवकाळात होईल अशी आशा बांधकाम व्यवसायिकांना आहे. होमऍप्लायन्सेसच्या दालनांतही खरेदी झाल्याने विजयादशमीच्या मुहूर्तावर किमान दोनशे कोटीहून अधिकची उलाढाल झाल्याचा व्यावसायिकांचा अंदाज आहे. वाहन, सोने, गृहप्रकल्प, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे आणि किराणा असे मिळून साधारण पुढील महिन्याभरात 1200 कोटी रुपयांची उलाढाल होईल असा अंदाज आहे.
बाजारपेठेत उत्साह
तीन वर्षानंतर बाजारपेठेत उत्साह दिसत आहे. यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने उसाचे पिक जोमदार आहे. उसाच्या एफआरपीसह इतर पिकांचे पैसे बळीराजाला मिळाले आहेत. मागील तीन वर्षातील खोळंबलेली खरेदी यंदाच्या वर्षी होईल याचे चित्र गणेशोत्सवातच दिसले. खासकरुन सोने, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे आणि किराणा व्यापारात तेजी दिसेल. हा खरेदीचा टप्पा 1200 कोटीपेक्षा अधिकचा होईल.डॉ. विजय ककडे (अर्थतज्ञ)
एफआरपीचे सहा हजार कोटी
राज्यातील कारखान्यांनी 42 हजार 11 कोटी 18 लाख रूपये एफआरपीचे अदा केले आहेत. कोल्हापूर जिह्यात यातील सुमारे सहा हजार कोटी रुपये आले आहेत. कोल्हापूरच्या बाजारपेठेतील उलाढालीचा शेतकरी हाच मोठा केंद्रबिंदू आहे. नोकरदार मंडळीकडून गुंतवणुकीच्या निमित्ताने अधिक उलाढाल होते. तीन वर्षानंतर अनेक खासगी कंपन्याकडून बोनस मिळण्याची शक्यता आहे. याचाही कोल्हापूरच्या बाजारपेठेवर परिणाम होणार आहे.









