कोल्हापूर प्रतिनिधी
लक्षतीर्थ वसाहत येथील अनधिकृत मशिद पाडल्यानंतर दसरा चौकात दगडफेक करण्यात आली होती. सहलीसाठी निघालेल्या बसवर दगडफेक केल्यामुळे बसचे नुकसान होवून दोन विद्यार्थी जखमी झाले होते. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समांतर तपास करुन जाफर मंजूर सिनदी (वय 20 रा. सी वॉर्ड, सोमवार पेठ), सुबेध शमशुद्दीन मुजावर (वय 27 रा. सी वॉर्ड, सोमवार पेठ ) या दोघांना अटक केली असून, एक अल्पवयीन तरुणही ताब्यात घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लक्षतीर्थ वसाहत येथील अनधिकृत मशिद पाडल्यानंतर दसरा चौक येथे आंदोलन करण्यात आले. याचदरम्यान ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय सोनेवाडी (जि. अहमदनगर) येथेली शाळेच्या सहलीच्या बसवर व चारचाकी वाहनावर दगडफेक करण्यात आली होती. यामध्ये बसच्या काचा फुटल्याने दोन विद्यार्थी जखमी झाले होते. या प्रकरणी अज्ञातांविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी याचा समांतर तपास करुन गुरुवारी रात्री जाफर सिनदी, सुबेध मुजावर या दोघांना अटक केली. पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, शेष मोरे यांनी या घटनेचा तपास केला.