परिसरातील टपऱ्याही हटविल्या; अगोदरच पार्कींगसाठी जागा मिळेना; अजब जिल्हा प्रशासनाचा गजब कारभार
कोल्हापूर प्रतिनिधी
नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरात नऊ दिवस 30 लाख भाविक येण्याचा अंदाज खुद्द पोलिस प्रशासनाने वर्तवला आहे. या तुलनेत शहरात पार्कीग व्यवस्था अपुरी पडण्याची शक्यता आहे. असे असताना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या दसऱ्या चौकातील मैदानात वाहने पार्कींगला यावर्षी बंदी घातली आहे. 100 ते 150 वाहने यामुळे पार्कींग होणार नाहीत. विशेष म्हणजे मैदानाच्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात आहेत. ‘अजब जिल्हा प्रशासनाला गजब कारभार’ या निमित्ताने समोर आला आहे.
नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी प्रचंड होते. शहरातील नियमित महापालिकेची पार्कींग ठिकाणे सोडून 12 ठिकाणी पार्कींगची सोय केली आहे. यामध्ये दसरा चौकातील पार्कींगचाही समोश होता. मुळातच येणारे भाविक आणि केलेली पार्कींगची सोयही तोकडीच ठरणार आहे. यामध्येच दसरा चौक येथील मैदानातील ऐनवेळी पार्कींग बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्याऐवजी मैदानात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
वास्तविक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी इतरही पर्याय आहेत. शाहू स्मारक हॉल जिल्हा प्रशासनाचा आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहामध्ये कार्यक्रम घेतला जाऊ शकतात. परंतू पार्कींगसाठी शहरात पर्याय मर्यादीत आहेत. मंदिर परिसरात जागा नाही. 30 लाख भाविक येणार असे गृहित धरले तरी शहरात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी रोज सुमारे 30 ते 40 हजार वाहनांची पार्कींगची सोय होईल, असे नियोजन होणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने दसरा चौकाला पर्याय व्हिनस कॉर्नर येथील गाडीअ•ा येथे पार्कींग करण्याचे ठरविले आहे. परंतू मनपाचे येथे अगोदर पार्कींग होतेच. हा नवीन पर्याय होऊ शकत नाही. त्यामुळे शहराच्या मध्यवस्तीमध्ये अनेक वर्षापासून सुरू असणारे मोफत पार्कींग बंद करून मैदानात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यामागे नेमका सुत्रधार कोण हे शोधण्याची वेळ आली आहे.
जिल्हा प्रशासनाचा हा कसला ‘न्याय’
दसरा चौक मैदानाच्या बाजूने सुमारे 15 टपरी चालक व्यवसाय करतात. त्यांच्यामुळे वाहतुकीची कोंडी होत नाही. त्यांना प्रशासनाने येथे 10 दिवस व्यवसायास बंदी घातली आहे. एकीकडे दसरा महोत्सवानिमित्त बचत गटांना उत्पन्न मिळवून देण्यासाठी दसरा चौक ते खानविलकर पेट्रोल पंप दरम्यान, रस्त्यावर स्टॉल उभारले. दुसरीकडे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अडथळा होत नसतानाही मैदानालगतच्या टपरी चालकांना हटविले आहे. जिल्हा प्रशासनाचा हा कसला ‘न्याय’ असा सवाल उपस्थित होत आहे.









