खरीप हंगाम पदरात पाडून नवरात्रात शक्तीची पूजा करत दसऱ्याला नव्या मोहिमा काढायच्या आणि सोनं लुटायचं अशी आपली भारतीय परंपरा आहे. अर्थात यानिमित्ताने आढावा, संघटन, योजना, उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष कृती यांना दिशा देणारा दिवस म्हणून या सणाकडे पाहिले जाते. यादिवशी सोने खरेदी होते. दिवाळीची चाहूल लागते आणि नवे उद्योग, व्यापार यांचा पाया रचला जातो. म्हणून दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा असे म्हटले जाते. अलीकडच्या काळात कोणतीही गोष्ट राजकारणाशी जोडली जाते आणि समाज माध्यमात, राजकीय आखाड्यात राजकारणाची धुणी धुतली जातात. देशात मोदी समर्थक आणि मोदी विरोधक अशा अर्थात एनडीए आणि इंडिया अशा दोन आघाड्या दंड थोपटू लागल्या आहेत. विविध सर्व्हे वेगवेगळे निष्कर्ष जाहीर करताना दिसत आहेत आणि महाराष्ट्राबद्दल तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. काँग्रेसने ‘फुकट’ पॅटर्न राबवून कर्नाटक विधानसभा एकहाती जिंकली. आता तेथे या ‘फुकट’ धोरणाची अंमलबजावणी करताना नाकीनऊ अवस्था प्राप्त झाली आहे. पण हाच कर्नाटक फुकट पॅटर्न काँग्रेसने धोरण म्हणून स्वीकारलेला दिसतो. सध्या सुरु असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी तेच गाजर मतदारांच्या शिंगाला बांधलेले आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीचा कौल सन 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी दिशादर्शक अर्थात लिटमस टेस्ट मानली जात आहे. भाजपला महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश येथे विशेष काळजी वाटते आहे आणि तेथील वेगवेगळे सर्व्हेही काळजी वाढवत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी या चार राज्यात विशेष करुन महाराष्ट्रात लक्ष घातले आहे. महाराष्ट्रात दसरा मेळाव्याची मोठी परंपरा आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेत असत आणि आपल्या घणाघाती भाषणाने शिवसैनिकांना चेतना देत असत. राज्यात आता शिवसेनेची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची शकले झाली आहेत. ज्याच्या हाती ससा तो पारधी या न्यायाने सर्वच पक्षात, संघटनात, नेत्यात ऐनकेन सत्ताप्राप्ती हे ध्येय अग्रस्थानी आहे. अनेकांना लालदिव्याचे स्वप्न पडते आहे. ओघानेच यंदाचे शिवसेना उबाठा व शिवसेना शिंदे या दोन्ही संघटनांच्या दसऱ्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे मेळावे, त्यांना होणारी गर्दी आणि उभय बाजूंनी होणारे वार, प्रतिवार यामुळे दसऱ्यालाच दिवाळीचे फटाके वाजतील हे वेगळे सांगायला नको. दसऱ्याला भगवानगडावर पंकजा मुंढे यांच्या नेतृत्वाखाली वंजारी समाजाचा तर गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आरेवाडीत धनगर समाजाचा मेळावा होतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत दसऱ्याला नागपुरातून स्वयंसेवकांना दिशा देतात. ओघानेच सर्वांनाच दसरा मोहिमेचे वेध लागले आहेत. शिवप्रतिष्ठानच्या दौडी आणि भीम आर्मीचे शाईफेक आंदोलन सुरु आहे. दसऱ्याला कोण किती गर्दी जमवतो याकडे सर्वांचे लक्ष असायचे पण जरांगे पाटील यांनी दीडशे एकरात विराट-अतिविराट गर्दी जमवून मराठा आरक्षणाबाबत जो एल्गार पुकारला त्यामुळे गर्दीचे सर्व निकष आता मागे पडले आहेत. यंदाचा दसरा महाराष्ट्रातील विविध प्रश्नांभोवती विशेष करुन आरक्षण या मुद्द्याभोवती फिरणार हे जाहीरच आहे. ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणा देत मराठा समाजाने प्रत्येक जिह्यात काढलेले मोर्चे लोक विसरले नाहीत. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. मध्यंतरी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी सत्तेवर आली तेव्हा थोडी नरमाई होती व आता शिंदे-फडणवीस सत्तारुढ झाले तेव्हा हा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे. त्यामुळे त्याला थोडा राजकीय वास येत असला तरी गरीब, श्रमिक, शेतकरी, शेतमजूर यांचे प्रश्न तेव्हाही व आजही कायम आहेत. या प्रश्नाला मतपेटीपासून न्यायालयीन निवाड्यापर्यंत आणि आत्मसन्मानापासून आर्थिकस्तर उंचावण्यापर्यंत अनेक संदर्भ आहेत. महाराष्ट्रात मराठा समाज संख्येने मोठा आहे. त्यामुळे त्यांना नाही म्हणण्याची कुणाही राजकीय पक्षाची हिंमत नाही. आरक्षण दिले तर ते कोणत्या कोट्यातून यासाठीही वाद आहेत. ओबीसी संघटना व नेते सतर्क झाले आहेत. छगन भुजबळ आणि जरांगे यांचे सवाल-जवाब बोलके आहेत. धनगर समाजही अनेक वर्षे आपल्या मागण्या घेऊन आंदोलन करतो आहे. ज्यांना सवलती मिळाल्या, ज्यांचे आर्थिक, शैक्षणिकस्तर उंचावले ते सवलती सोडायला तयार नाहीत. कुणाला दुखावले तर मतपेटीतून दणका ठरलेला आहे. या पार्श्वभूमीवर हा प्रश्न हाताळणे गरजेचे आहे. पण त्यासाठी जी समज, सार्वमत राजकीय नेत्यात आवश्यक आहे पण ती नाही. मराठा संघाचे अण्णासाहेब पाटील व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसचे विलासराव देशमुख यांनी जात, धर्म यापलीकडे जाऊन ‘आर्थिक मागासांना ‘आरक्षण’ ठराविक वर्षासाठी द्या असे म्हटले होते. पण आता हा विषय तापला आहे. न्याय-अन्यायाचे प्रश्न कायद्याच्या व नैसर्गिक न्यायाच्या कसोटीवरच सोडवावे लागतात. या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यात कोण काय भूमिका घेतो हे पहावे लागेल. दुसरीकडे राजकारणाचा झालेला चिखल, आयाराम-गयाराम संस्कृती, खोक्याचे राजकारण, खरी-खोटी शिवसेना हे विषय तोंडी लावणीला असतीलच. राष्ट्रवादीचे काय होते आणि सोळा आमदारांची पात्रता, जोडीला राहुल नार्वेकरांची भूमिका या संबंधानेही वार-प्रतिवार होतील. दसऱ्याची मोहीम लोकसभेसाठीचे रणशिंग फुंकणारी असेल. राजकारण्यांच्या यासाऱ्या चिखलात एक आनंद व प्रेरणादायी घटना म्हणजे मुंबईत बैठकीला गेलेले सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी रस्त्यावर कांद्याची पोती उचलणाऱ्या एका माणसाला उत्स्फूर्तपणे केलेली मदत चर्चेची ठरली आहे. त्यांचा हा फोटो समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. खेडेगावात शेतकरी, कष्टकरी डोक्यावरुन, पाठीवरुन ओझी वाहत असतात हा भार उचलताना त्यांना कुणीतरी हातभार लावतो याला उचलू लागणे म्हणतात. कृषि संस्कृतीत याला महत्त्व आहे. तसेच ते जीवनातही आहे. आज अनेक स्तरावर समाज दुभंगत असताना समाजातील गरिबांना उचलू लागण्याची, मदत करण्याची आणि त्यांच्या पंखांना शक्ती देण्याची गरज आहे. दसऱ्याची ही खरी मोहीम ठरेल. अन्यथा नुसती राजकीय धुणी आणि खोकी.








