गणेशोत्सव झाल्यानंतर आता सर्वाना वेध लागले आहेत ते दसरा आणि दिवाळीचे. सर्वसामान्य लोकांसाठी असे उत्सव म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. पण हा आनंद आपण भगवंतासोबत साजरा न करता स्वत:ला ज्यामध्ये आनंद प्राप्त होतो त्याप्रमाणे साजरा करतो. असा आनंद म्हणजे दसऱ्याला 10 दिवस कर्कश आवाजात सिनेमाची गाणी लावून रात्री उशिरापर्यंत गरबा नृत्य करणे, दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने वाटणे, नवीन कपडे घालून नटणे असा हा उत्सव साजरा केला जातो. त्याचप्रमाणे दिवाळीच्या दिवसात फटाक्यांची आतषबाजी करणे, नवनवीन कपडे घालून फराळ खाणे, पहाटेच्या वेळी सिनेगीतांच्या, भावगीतांच्या मैफिली रंगविणे, पत्ते खेळणे इत्यादी स्वरूपात हा सण साजरा केला जातो. निश्चितच उत्सवांचा उद्देश आहे आनंद प्राप्त करणे, पण हा आनंद भगवंतांच्या प्रसन्नतेकरिता दसरा आणि दीपावली या दिवसाचे महत्त्व समजून घेऊन साजरा केल्यास खरोखरच जो आनंद अपेक्षित आहे तो प्राप्त होईल.
वरील सर्व कार्यक्रमांचा धर्माशी दुरान्वयेही संबंध नाही. दसरा हा प्रामुख्याने श्रीरामाने रावणाचा वध करून धर्माचे रक्षण केले म्हणून तर, दीपावली हा सण प्रभू श्रीरामचंद्र 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येला परतले याचा आनंद म्हणून सर्व अयोध्यवासियांनी आपल्या घरावर आकाशकंदील लावून, पणत्या, दिवे लावून मिठाई वाटून प्रभू श्रीरामांचे गुणगान करत, कीर्तन करत साजरा केला. याच वेळी नरकचतुर्दशी दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराच्या तावडीतून 16 सहस्त्र राजकन्यांची सुटका करून त्यांच्याशी विवाह केला याचा आनंदही साजरा केला जातो. परंतु या दिवसांचे महत्त्व समजून न घेता, आपल्या पूर्वजांनी जसे हे उत्सव साजरे केले तसे अत्यंत सात्विक व धार्मिक वातावरणात साजरे न करता आज दुर्दैवाने हे सणांचे दिवस तामसिक, धर्माशी कुठलाही संबंध नसलेल्या मार्गाने हिडीस स्वरूपात साजरे केले जातात. यामुळे धर्माची हानी तर होतेच पण त्याचबरोबर ज्यासाठी हे उत्सव साजरे केले जातात तो उद्देशही असफल होतो आणि पुढील पिढीवर आपण चुकीचे संस्कार करीत असतो.
आपल्या पूर्वजांनी दसरा हा उत्सव कसा साजरा केला हे तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा यांच्या अभंगात वर्णन येते. ते म्हणतात, पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सांपडला तो साधा आजि मुहूर्त बरा । गर्जा जयजयकार हरी हृदयिं धरा । आळस नका करू लहाना सांगतों थोरां ।।1।। या हो या हो बाइयांनो निघाले हरी । सिलंगणा वेगीं घेऊनि आरत्या करी। ओवाळूं श्रीमुख वंदूं पाऊले शिरी। आम्हां दैव आले येथे घरच्या घरी ।।2।। अक्षय मुहूर्त ओटामध्ये साधतें। मगयेरी गर्जे जैसे तैसे होत जातें।म्हणोनि मागे पुढे कोणी न पहावे येथें । सांडा परते काम जाऊं हरी सांगातें ।।3।। बहुतां बहुतां रीती चित्ती धरा हे मनीं । नका गई करूं आईकाल ज्या कानी । मग हे मुख तुम्हीं कधी न देखाल स्वप्नी । उरेल हायहाय मागें होईल कहाणी ।।4।। ऐसियास वंचता त्याच्या अभाग्या पार । नाहीं नाहीं नाहीं सत्य जाणा निर्धार । मग हे वेळ घटिका न ये अजरामर । कळले असों द्या मग पडतील विचार ।।5।। जयासाठीं ब्रम्हादिक झाले ते पिसे। उच्छिष्टत्कारणें देव जळी झाले मासे। अर्धांगी विश्वमाता लक्षुमी वसे । तो हा तुकया बंधू म्हणे आले अनायासें ।।6।। अर्थात ‘आजचा दिवस अगदी पवित्र आणि उत्तम आहे, कारण दसरा हा चांगला मुहूर्त सापडला आहे. त्यामुळे तुम्ही हरिनामाचा जयजयकार करा आणि हरीला हृदयात धारण करा. हरिनाम घेण्यास आळस करू नका असे मी सर्व लहानथोर लोकांना सांगतो आहे. याहो याहो बाइयानो हातामध्ये आरत्या घेऊन या, कारण हरी सीमोल्लंघन करण्याकरिता निघाले आहेत त्यांचे श्रीमुख ओवाळू व पावलांवर मस्तक ठेवून वंदन करू, आम्हाला घरच्या घरी दैव प्राप्त झाले आहे. साडेतीन मुहूर्तापैकी दसरा हा सण अक्षय मुहूर्त मानला जातो. या मुहूर्तामध्ये जे कार्य आपण हाती घेऊ ते कार्य सहजगत्या आणि निर्विघ्नपणे पार पडते. त्यामुळे मागेपुढे काहीही पाहू नका. सर्व काम बाजूला सारा आणि हरिच्या सोबतच रहा. तुम्ही हे निश्चितपणे आपल्या चित्तामध्ये आणि मनामध्ये धारण करा आणि यापैकी कोणी कानाने हे ऐकेल त्यांनी मागेपुढे विचार करू नका. एकदा अशी वेळ निघून गेली की हरिचे सुंदर मुख तुम्हाला स्वप्नातदेखील कधी दिसणार नाही, मग मागे तुम्हाला हाय हाय करत पश्चाताप करण्याची वेळ येईल. अशा मुहूर्ताला जो वंचित राहतो त्याच्या अभाग्याला पारावार नाही, नाही, नाही असे मी त्रिवार सांगतो, आणि हे सत्य तुम्ही निर्धाराने जाणून घ्यावे. अशा प्रकारची अजरामर वेळ घटिका पुन: पुन्हा येणार नाही हे तुम्हाला कळले असेलच, आणि नाही कळले तरी पुढे तुम्ही विचारात पडाल. तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा म्हणतात, ज्याच्यासाठी ब्रम्हादिक देव वेडे झाले आणि ज्यांचे उच्छिष्ट खाण्याकरिता देव यमुनेच्या पाण्यातील मासे झाले, विश्वाची माता अर्धांगिनी लक्ष्मी ज्याच्याबरोबर सहवास करते असे विष्णू अनायासे आज आले आहेत..’
दसरा-दिवाळी हा सण संतांसाठी केवळ त्या दिवसापुरताच मर्यादित राहत नाही तर असा आनंद संत कायमच घेत असतात. म्हणून तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, दसरा दिवाळी तोचि माझा सण । सखे हरि जन भेटतील ।।1।। अमूप जोडील्या पुण्याचीया राशी । पार त्या सुखासी नाही लेखा ।।2।। धन्य दिवस आजी झाला सोनियाचा। पिकली हे वाचा रामनामें ।।3।। तुका म्हणे काय होऊ उतराई । जीव ठेवू पायी संतांचिये ।।4।। अर्थात ‘ज्या दिवशी मला हरिभक्त भेटतील तोच दिवस माझ्यासाठी दसरा आणि दिवाळीसारखा आहे. ज्या दिवशी मला सखे हरिजन भेटतील त्या दिवशी मला अनेक पुण्याच्या राशी जोडल्या जातील आणि त्या सुखाला अंतपारही राहणार नाही आणि अशा सुखाची तुलना कशाशीही करता येणार नाही. आज मला सखे हरिजन भेटले त्यामुळे आजचा दिवस सोन्याचा झाला आहे आणि त्यांच्या संगतीमध्ये माझ्या वाणीलादेखील रामनामाचे पीक भरपूर आले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा संतांचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही म्हणून माझा जीवच त्यांच्या चरणाशी अर्पण करतो.”
आणखी एका अभंगात काही गुपित महाराज सांगत आहेत, ते समाजाने ऐकल्यास आणि पालन केल्यास त्यांना दसरा दिवाळी साजरा केल्याचा आनंद होईल. ते म्हणतात, आम्हा देणे धरा सांगतो ते कानी । चिंता पाय मनीं विठोबाचे ।।1।। तेणे माझे चित्त होय समाधान । विलास मिष्टान्न नलगे सोने।।2।। व्रत एकादशी दारी वृन्दावन । कंठी ल्यारे लेणे तुळशीमाळा ।।3।। तुका म्हणे त्याचे घरीची उष्टावळी । मज ते दिवाळी दसरा सण ।।4।। अर्थात ‘तुम्ही मला जर काही देत असाल तर मी सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐका आणि मनामध्ये साठवून ठेवा, ते असे की तुम्ही सर्व काळ विठ्ठलाच्या चरणांचे चिंतन करा. एवढे जरी तुम्ही मला दिले तर त्या योगाने माझ्या चित्ताला समाधान होईल, मग मला तुमचे मिष्टान्न, विलास, सोने वगैरे काहीच नको. तुम्ही एकादशी व्रत पालन करा, दाराच्या प्रवेशद्वारी तुळसी वृंदावन बांधा, कंठामध्ये हरिनाम आणि गळ्यामध्ये तुळसीमाळेचा अलंकार परिधान करा. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे जे वागतील त्यांच्या घराचे उच्छिष्ट मिळाले तरी मला दसरा-दिवाळीचा सण आहे असे वाटेल.”
हे संतांचे उपदेश आपल्या जीवनात पाळले तर येणारा दसरा, दिवाळीचा सण साजरा केल्याचा खरा आनंद केवळ त्या दिवशीच नाही तर आयुष्यभर मिळत राहील आणि आपल्या मनुष्यजीवनाचे सार्थक होईल.
-वृंदावनदास








