डिचोली, मये मतदारसंघात पाणीपुरवठा खंडित :अखेर दुरुस्तीअंती शुक्रवारी पाणीपुरवठा सुरळीत

डिचोली : मुस्लीमवाडा डिचोली येथील पोलीस क्वॉटर्सजवळ वीज खात्यातर्फे सुरू असलेल्या भूमीगत वीजवाहिनीचे काम करताना मुख्य 350 डायमीटरची मुख्य जलवाहिनी फुटल्याने गुरु. दि. 6 एप्रिल रोजी संध्याकाळपासून डिचोली व मये मतदारसंघातील पाणीपुरवठा ठप्प झाला. गुरुवारी रात्रीच या जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाला युद्धपातळीवर प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, काल शुक्र. दि. 7 एप्रिल रोजी दुपारपर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले होते. त्यामुळे दुपारीच पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. परंतु, दुरुस्त करण्यात आलेल्या जागीच जलवाहिनीतून पाण्याची मोठी गळती पुन्हा सुरू झाली होती. त्यामुळे सदर गळती रोखण्यासाठी काम हाती घेण्यात आले होते. डिचोली शहरात सध्या वीज खात्यातर्फे भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जमिनीखालून ठराविक अंतरावर छीद्र पाडून विद्युत केबल घालण्यात येते. या कामात डिचोली शहरातील अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटल्या आहेत. या कामामुळे लोकांना अनेक दिवस खंडित पाणीपुरवठ्याचा फटका बसलेला आहे.
या भमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम सध्या डिचोली शहरातून मुस्लीमवाडा येथे मुख्य रस्त्याचा बाजूला सुरू आहे. हे काम करताना गुरु. दि. 6 रोजी संध्याकाळी पोलीस क्वॉटर्सजवळ रस्त्याच्या खालून असलेली डिचोली व मये मतदारसंघाला पाणीपुरवठा करणारी मुख्य 350 डायमीटरची जलवाहिनी फुटली. त्यामुळे पाण्याचा जोरदार प्रवास सुरू झाला. या जोरदार पाण्याच्या दबावामुळे रस्त्याला खालून भलेमोठे भगदाड पडले. तर हजारो लीटर पाणी बराच वेळ वाहून गेले. तर फुटलेल्या जलवाहिनीमुळे डिचोली व मये मतदारसंघातील बहुतेक भागांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. संध्याकाळनंतर डिचोली व मये मतदारसंघातील नळ कोरडे पडले होते. ते काल शुक्र. दि. 7 एप्रिल रोजी दुपारपर्यंत पाणीपुरवठा खंडित होता. त्यामुळे लोकांची बरीच अडचण झाली. दुसऱ्या बाजूने साबांखाच्या पाणीपुरवठा विभागाकडून या जलवाहिनीचे दुरुस्तीकाम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत तसेच सकाळीही हे काम सुरूच होते. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो, नगराध्यक्ष कुंदन फळारी, स्थानिक नगरसेवक रियाझ बेग, मयेचे आमदार प्रमेंद्र शेट यांनी याची दखल घेऊन दुरुस्तीकाम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. अखेर शुक्रवारी दुपारी सर्व काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यानंतर डिचोली व मये मतदारसंघातील लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.









