अध्याय दुसरा
बाप्पा म्हणाले, राजा समाधानी राहण्यासाठी फळाची गरज नाही हे तुझ्या लक्षात आलंय ना, मग केलेलं कर्म मला अर्पण कर म्हणजे त्या फळामुळे जे काही पाप पुण्य तयार होईल ते भोगण्यासाठी तुझा पुनर्जन्म होणार नाही. हे जन्ममृत्यूचं चक्र तू भेदलस की, आपोआप मला येऊन मिळशील. तेव्हा इथुन पुढे निरपेक्ष बुद्धीने आसक्तीरहित कर्म करून लोकसंग्रह कर. लोकांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून दे म्हणजे त्यांनाही त्यांचा उध्दार करून घेण्याची प्रेरणा मिळेल. हाच उदात्त हेतू मनात ठेवून हे मोक्षपदी बसलेले ब्रम्हर्षी आणि राजर्षी कार्य करत असतात. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन तुही आसक्तीरहित होऊन लोकसंग्रह कर कारण श्रेष्ठ पुरुष जे कर्म करतो, त्याचंच अनुकरण सर्व लोक करतात. पुढे बाप्पा म्हणाले, तुला मी नुसता उपदेश करत नाही तर स्वत:ही तसे आचरण करतो ह्या आशयाचा
विष्टपे मे न साध्यो स्ति कश्चिदर्थो नराधिप। अनालब्धश्च लब्धव्य कुर्वे कर्म तथाप्यहम् ।। 22।। हा श्लोक आपण पहात आहोत.
बाप्पा म्हणतायत, राजा मी निर्गुण निराकार परमेश्वराचे सगुण रूप आहे. मीच सर्व सृष्टीचा निर्माता असल्याने ह्या सृष्टीतून मला नव्याने मिळवण्यासारखे काहीच नाही पण भक्तांच्या संकट निवारणासाठी मी सगुण अवतार घेतलाय, त्यानुरूप कर्तव्य बजावण्यासाठी मलाही कर्मे करावी लागतात. ती पाहून इतरांना प्रेरणा मिळावी असा उद्देश आहे. प्रत्येक ईश्वरी अवतारातून घडलेली कर्मे आदर्श निर्माण करण्यासाठीच असतात. राजा, मी जसा ईश्वरी अवतार आहे तसाच तुही आहेस. तेव्हा योग्य कर्मे करून समाजापुढे आदर्श निर्माण कर म्हणजे तुझे जीवन सार्थकी लागेल. तसा प्रत्येकजण ईश्वराचाच अवतार आहे पण फार थोड्यांच्या ते लक्षात येतं. त्यामुळे ज्यांच्या हे लक्षात आलंय त्यांची जबाबदारी अधिकच वाढते. हे ज्यांच्या लक्षात आलेलं आहे अशा सिद्ध मंडळींनी स्वत: सिद्ध झाल्यावर आपले काम झाले, आपली मोक्ष साधना पूर्ण झाल्याने आपला उद्धार होणार हे निश्चित आहे मग आता आपण स्वस्थ बसले तरी चालेल असा स्वत:पुरता संकुचित विचार न करता इतरांचे भले होण्याच्या दृष्टीने लोकसंग्रह केलेला आहे. त्यांना एकत्र आणून त्यांच्यातील सुप्त शक्तीची जाणीव करून दिलेली आहे. असं करण्यामागे दोन कारणं आहेत. एक म्हणजे समाजापुढे जे आदर्श असतात. त्यांचं अनुकरण करायला लोकांना फार आवडतं. आपण त्यांच्याप्रमाणे वागलो की त्यांच्यासारखं आपलही भलं होईल असा उद्देश त्यामागे असतो. त्यादृष्टीने त्यांच्यापुढे योग्य आदर्श ठेवण्याची जबाबदारी सिद्ध मंडळींची आहे आणि दुसरं कारण म्हणजे लोकांना त्यांच्यातल्या सुप्त शक्तीची जाणीव करून देणे. तेही ईश्वरी अवतार आहेत अशी त्यांची खात्री पटवून देणे. ह्या दोन्ही कारणाच्यामागे सर्व समाजाचा उध्दार व्हावा हा हेतू असतो. स्वत: ईश्वराने जेव्हा जेव्हा अवतार घेतला आहे त्या त्या वेळी असे कार्य केलेले आहे. पुढील श्लोकात बाप्पा म्हणतात जर अवतार काळात मी लोकसंग्रहाचे कार्य केले नाही तर सर्व लोक माझेच अनुकरण करतील.
कुर्वे हं यदा कर्म स्वतत्रो लसभावित ।
करिष्यन्ति मम ध्यानं सर्वे वर्णा महामते ।। 23 ।।
अर्थ- स्वत:च्या तंत्राने चालून आळशीपणाने मी जर कर्म केले नाही, तर हे महामते, सर्व वर्ण माझेच अनुकरण करतील.
विवरण- बाप्पांना राजाच्या बुद्धिमत्तेचे विलक्षण कौतुक आहे म्हणून ते त्याला या श्लोकात महामते म्हणून संबोधतात आणि सांगतात, या विश्वामध्ये सर्व श्रद्धाळू आणि धार्मिक लोकांचे, भक्तांचे आणि जिज्ञासू साधकांचे मी आश्रयस्थान आहे. ते मला श्रेष्ठ व आदर्श मानतात. मीच जर कर्म केले नाही, तर अन्य लोक त्यांच्या कर्माचे अनुष्ठान करणार नाहीत.
क्रमश:








