ऑनलाईन टीम / तरुण भारत :
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नगरच्या शेवगाव शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीदरम्यान अचानक एका गटाने मिरवणुकीवर दगडफेक केली. त्यानंतर दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटाने परिसरात दगडफेक करत अनेक वाहनांची तोडफोड केली. यात अनेक वाहनांचे नुकसान झाले असून, 4 पोलीस जखमी झाले आहेत. याप्रकरणी 30 ते 35 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शेवगाव शहरात काल सायंकाळी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक रात्री आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. यावेळी अचानक मिरवणुकीच्या दिशेने एका गटाकडून दगडफेक करण्यात आली. त्यानंतर दोन्ही गटात वाद उफाळला. दोन्ही गटांनी परिसरातील वाहनांवर दगडफेक करत दुकानांचीही तोडफोड केली. यावेळी लाठीमार करत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दगडफेकीत चार पोलीस जखमी झाले आहेत.
या प्रकरणी 30 ते 35 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 102 लोकांसह 50 अज्ञात व्यक्तींविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या 2 तुकडय़ा सध्या शेवगावमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, हा वाद नेमका का सुरू उफाळला, याचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असून, नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात येत आहे. सध्या शेवगावमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.









