दोडामार्ग – वार्ताहर
नवरात्र उत्सवानिमित्त तालुक्यातील आयनोडे पुनर्वसन येथे दुर्गामाता दौडीचे मोठ्या उत्साहाने आयोजन करण्यात आले होते. या दौडीत गावातील अनेक युवक – युवतीसह ग्रामस्थही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही दौड गावातील ग्रामदैवत श्री देव भूतनाथ मंदिरापासून सुरुवात करून संपूर्ण गावात काढण्यात आली.
नवरात्रोत्सवात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आदिमाया – आदिशक्तीचा जागर करण्यात येत असतो. आई जिजाऊंनी दाखवलेल्या, श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी उज्वल केलेल्या राष्ट्रभक्ती – धर्मभक्तीच्या मार्गावर जोमाने चालण्याचे बळ मिळवण्यासाठी व अवघी तरुण पिढी सशक्त निर्व्यसनी, राष्ट्रभक्त, धर्मभक्त, देशभक्त बनवण्यासाठी, उगवती तरुण पिढी श्री शिवाजी, श्री संभाजी या दोन महामृत्युंजय मंत्राच्या विचारांची, कार्यकर्तृत्वाची, ध्येयधोरणांनी युक्त तरुण पिढी घडावी हा यामागचा उद्देश आहे असे धारकरी सुशांत सावंत यांनी स्पष्ट केले. गावात पहाटे 6 वाजता वीर बजरंगी तरुण व दुर्गा तरुणी एकत्र येत गावातील ग्राम मंदिरापासून हातामध्ये भगवा ध्वज व सफेद टोपी परिधान करत मुखाने भारतमातेचा जयघोष करत व छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणा मंत्र म्हणत गावातून ठरलेल्या मार्गावरून मार्गक्रमण केले. यावेळी संपूर्ण गाव शिवमय झाल्याचे पहावयास मिळाले.









