सांबरा /वार्ताहर
सांबरा येथे मारुती गल्ली धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौकमधील महादेव व्यायाम मंडळाच्यावतीने श्री दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली असून त्यानिमित्त शुक्रवारी आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
मंडळाचे यंदाचे हे 24 वे वर्ष असून येथे दरवर्षी श्री दुर्गामातेची प्रतिष्ठापना केली जाते. या दरम्यान अनेक विधायक कार्य देखील राबविले जाते. सकाळी नऊ वाजता मंडपामध्ये महाचंडिका होम उत्साहात पार पडला. यावेळी गावातील अनेक भक्त उपस्थित होते. दुपारी दीडनंतर महाप्रसाद वाटपाला प्रारंभ करण्यात आला. दुपारच्या वेळी काही वेळ पावसानेही हजेरी लावली मात्र पावसाची तमा न बाळगता भक्तांनी महाप्रसाद घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी सुमारे पाच हजारहून अधिक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसाद तयार करण्यासाठी व वाटपासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यासह गावातील तरुणांनी सहकार्य केले.









