विविध सामाजिक संदेश देणारे देखावे सादर : पालखी, घोडे अन् बैलजोड्यांचा मिरवणुकीत सहभाग
वार्ताहर /किणये
तालुक्यात रविवारी दुर्गामाता दौड अमाप उत्साहात काढली. विविध गावांमध्ये झालेल्या दौडमध्ये धारकरी तरुण व तरुणींचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे सर्वत्र दौड जल्लोषात झाली. दौडच्या माध्यमातून तालुक्यात नवचैतन्य निर्माण झाले होते. विविध सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करण्यात आले होते. दौडमुळे बहुतांशी गावे भगवेमय बनली होती. बऱ्याच गावांमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित प्रमुख मान्यवरांची भाषणे झाली. कर्ले, बहादरवाडी गावात रविवारी जल्लोषात दौड काढली. शिवमूर्तीचे व शस्त्र पूजन करून दौडला सुरुवात झाली. दौडनिमित्त सर्वत्र आकर्षक रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. घरोघरी महिला आरती ओवाळून स्वागत करत होत्या.
सावगावात दौडमध्ये बैलजोडीचा सहभाग
सावगावात रविवारी दुर्गामाता दौडनिमित पालखी सोहळा, घोडे व बैलजोड्यांची मिरवणूक काढली. ही रविवारची दुर्गामाता दौड या भागातील लक्षवेधी ठरली. शिवस्मारक येथून दौडला सुरुवात करण्यात आली. दौडमध्ये घोडे सहभागी करण्यात आले होत. घोड्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान केलेले बालचमू बसले होते. दौडमध्ये पालखी मिरवणूक काढली होती. यावेळी तरुणींनी मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी वेशभूषा परिधान केली होती. बैलजोडी घेऊन काही धारकरी सहभागी झाले होते. सावगावमधील दौड पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होता.
हंदिगनूर येथे दौड उत्साहात : उद्या व्याख्यान
हंदिगनूर येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दुर्गामाता दौड उत्साहात काढली जात आहे. यानिमित्ताने गल्लोगल्ली भगव्या पताका, रांगोळी, फुले आणि तोरण बांधून गाव सजवण्यात आले आहे. बालक, तरुण मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागले आहेत.
स्वाती पाटील यांचे व्याख्यान
मंगळवार दि. 24 रोजी दौडची सांगता होणार आहे. त्या दिवशी सकाळी 10 वाजता खानापूर येथील स्वाती पाटील यांचे शिवाजी महाराजांवर व्याख्यान होणार आहे. गावातील शिवप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.









