वार्ताहर /किणये
तालुक्यात मंगळवारी शेवटच्या दिवशी दुर्गामाता दौड अभूतपूर्व वातावरणात झाली. या दुर्गामाता दौडमध्ये गावागावातील नागरिक एकवटले होते. मंगळवारी या दौडची उत्साहात सांगता झाली. दौडच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश देणारे देखावे तरुण व तरुणींनी सादर केले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालिन वेषभूषा परिधान केल्या होत्या. गावागावांमध्ये भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. तरुणांनी डोक्यावर भगवे फेटे परिधान केले होते. यामुळे गावामध्ये भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. नऊ दिवसांपासून तालुक्याच्या गावागावांमध्ये पहाटेच्यावेळी प्रचंड उत्साहात दुर्गामाता दौड निघत होती. दौडला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गावातील देवदेवतांचे पूजन या दौडच्या माध्यमातून करण्यात आले. गल्ल्यागल्ल्यांमध्ये दौडचे स्वागत करण्यासाठी आकर्षक अशा रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. पुष्पवृष्टी करून दौडचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत होते.
बळीराजाची व्यथा मांडणारे देखावे
यंदाची दुर्गामाता दौड चैतन्यमय बनली होती. तरुणांबरोबरच गावागावातील वडिलधारी मंडळींनीही त्यामध्ये सहभाग घेतला होता. रोज वेगवेगळ्या पद्धतीचे सादरीकरण करण्यात येत होते. बळीराजाची व्यथा मांडणारी देखावे व ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे देखावे त्याचे सादरीकरण करण्यात आले.
किणयेत विविध सजीव देखावे
किणये गावातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता दौडची मोठ्या उत्साहात सांगता झाली. शेवटच्या दिवशी किणये गावात विविध प्रकारचे देखावे सादर करण्यात आले. यामध्ये महिलांनी जात्यामध्ये भात व अन्य प्रकारची धान्ये भरडताना, उखळात कांडप करताना, चुलीवर भाकऱ्या करताना, पाळणा गीत म्हणताना, बाळूमामाचे दर्शन घडविताना असे सजिव देखावे सादर केले होते. हे पाहण्यासाठी किणये पंचक्रोशीतील नागरिकांनी गावात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ध्वजपूजन ज्ञानेश्वर महादेव बिर्जे यांच्या हस्ते करण्यात आले तर महेश विठ्ठल डुकरे, अनिकेत कृष्णा खन्नूकर, युवराज विष्णू डुकरे, सागर मारुती पाटील, निवृत्ती डुकरे आदींच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन मारुती डुकरे यांच्या हस्ते करण्यात आले. गावात या दौडचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक गल्लीमध्ये आकर्षक फुलांची सजावट केली होती.
वाघवडेत दुर्गामाता दौड जल्लोषात
वाघवडे गावात दुर्गामाता दौड जल्लोषात झाली. गावातील तरुणांनी व मुलींनी छत्रपती शिवाजी महाराज, शिवरायांचे मावळे, राजमाता जिजाऊ, झांशीची राणी आदींची वेषभूषा परिधान केली होती. गावातील संपूर्ण गल्ल्यांमध्ये आकर्षक रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. दौडला तरुणाईंचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात लाभला. तसेच तालुक्याच्या गावांमध्ये दौडची उत्साहात सांगता झाली.
देसूर येथील दुर्गामाता दौडची यशस्वी सांगता
देसूर येथील नवरात्र उत्सवात घटस्थापनेपासून सुरू असलेल्या दुर्गामाता दौडची जल्लोषी आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयघोषात मंगळवार दि. 24 रोजी सांगता झाली. प्रतिवर्षाप्रमाणे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान देसूर यांच्या वतीने नवरात्र उत्सवात काढण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये गावातील युवक, युवती, पुरूष व महिला या सर्वांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. दौडमध्ये भाग घेतलेल्या सर्व शिवभक्तांनी भगवे डोकीला फेटे बांधले होते. आणि गावातील प्रत्येक गल्लीत रांगोळ्या व भगव्या पताका बांधल्याने संपूर्ण देसूर गाव भगवेमय दिसत होते. विजयादशमी दिवशी दौडचा शेवटचा दिवस असल्यामुळे प्रत्येक गल्लीत घरोघरी सुवासिनींनी आरती ओवाळून आणि पुष्पवृष्टी करून दौडचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. पंकज घाडी यांनी हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी युवकांनी पुढे येण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक प्रा. संभाजी भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली शिवकालीन प्रथेप्रमाणे भगव्या ध्वजाखाली एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर ध्येयमंत्राने दौडची सांगता झाली. दौडमध्ये अरुण काळसेकर, राजू जळगेकर, उत्तम पाटील, नागराज सावंत, किसन लाड आदी गावातील धारकरी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.