पहिल्या दिवशी मोठा प्रतिसाद : ‘जय शिवाजी जय भवानी’चा जयघोष
प्रतिनिधी /बेळगाव
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन बेळगावच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित भव्य दुर्गामाता दौडला घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर उत्साहात प्रारंभ झाला. ‘जय शिवाजी जय भवानी’च्या जयघोषात पारंपरिक वेशात भगवे फेटे, पांढऱया टोप्या परिधान करून हजारो तरुण सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी युवापिढीमधील देव, देश व धर्मप्रेमाचा जोश दिसून आला.
सोमवारी पहाटे 5 वाजता शहापूर, शिवाजी उद्यान येथील शिवमूर्तीला अभिषेक करण्यात आला. परंपरेनुसार वासुदेव छत्रे गुरुजी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. छत्रे गुरुजी व त्यांच्या सहकाऱयांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. शिवाजी उद्यान येथून पहिल्या दिवशीच्या दौडला सुरुवात झाली.
शास्त्रीनगर, महाद्वार रोड या परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य स्वागत कमानी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या. महिलांनी रात्रभर मेहनत घेऊन गल्लोगल्ली भव्य रांगोळय़ा काढल्या होत्या. त्या रांगोळय़ांमध्ये आकर्षकरित्या फुलांची सजावट करण्यात आली होती. यामुळे एक चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.
शास्त्रीनगर, महात्मा फुले रोड, महाद्वार रोड, समर्थनगर येथे गल्लोगल्ली जल्लोषी वातावरणात फुलांचा वर्षाव करत दौडचे स्वागत करण्यात आले. सुवासिनींनी ध्वजधारी धारकऱयांचे औक्षण केले. दौडमध्ये लहान मुलांसह महिला, युवती, दिव्यांग व वयोवृद्धांचाही समावेश होता. दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात पहिल्या दिवशीच्या दौडची सांगता झाली. पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी व मार्केटचे एसीपी नारायण बरमणी यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला.
घरोघरी फडकला भगवा
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने केलेल्या आवाहनानुसार सोमवारी बऱयाचशा घरांवर भगवा ध्वज फडकला. हिंदुत्वाचे प्रतीक मानला जाणारा भगवा ध्वज गल्लोगल्ली डौलाने फडकत होता. महाद्वार रोड, शास्त्रीनगर या परिसरात अनेक गल्ल्यांमध्ये भले मोठे ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. दौडमध्ये सहभागी अश्व व त्यांच्यावरील मावळय़ांच्या वेशात असणारे तरुण आकर्षण ठरत होते. समर्थनगर येथे पहिल्यांदाच दौड दाखल झाल्याने भव्य स्वागत करण्यात आले. शिवरायांच्या जीवनावर आधारित देखावे लहान मुलांनी सादर केले.
बुधवार दि. 28 रोजीचा दौडचा मार्ग
चन्नम्मा चौक येथील गणेश मंदिरापासून दौडला सुरुवात होणार आहे. काकतीवेस रोड, खडक गल्ली, कोर्ट, चव्हाट गल्ली, पी. बी. रोड, आरटीओ सर्कल, शिवाजीनगर, सम्राट अशोक चौक, गांधीनगर, परत श्री दुर्गामाता मंदिर किल्ला येथे सांगता होईल.









