तालुक्यात सर्वत्र शिवमय वातावरण, गावोगावी शिवकालीन देखावे : दौडीला सर्वत्र अमाप प्रतिसाद
खानापूर : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्यावतीने तालुक्यात दौडीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या दौडीची मंगलमय वातावरणात मंगळवारी सांगता करण्यात आली. तालुक्यात सर्वत्र शिवकालीन वातावरण निर्माण झाले होते. गावातील प्रत्येक गल्लीत शिवकालीन देखावे सादर करण्यात आले होते. यात गावातील महिला, बालके आणि युवकांचा सहभाग होता. सर्वत्र मंगलमय आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. तालुक्यात पहाटे 5 पासून दौडीचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यात सर्वत्र पहाटे 5 वाजता शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक व पूजा करून 5.30 वाजता दौडीला सुरुवात करण्यात आली. शहरातील शिवस्मारक येथील शिवाजी पुतळ्याची आमदार विठ्ठल हलगेकर, युवा कार्यकर्ते निरंजन सरदेसाई यांच्या हस्ते पूजन करून दौडीची सुरुवात करण्यात आली.
शिवस्मारक येथून दौड बुरुड गल्ली येथे लक्ष्मी मंदिरात आल्यानंतर दौडीचे स्वागत करण्यात आले. दौड लक्ष्मीनगर येथून न्यू नाईक गल्लीत दौडीचे आगमन झाले. यानंतर समादेवी मंदिर या ठिकाणी दौडीचे भव्य स्वागत करण्यात आले. दौडचे होसमणी गल्लीत आगमन होताच शिव मंदिराजवळ होसमणी गल्ली रहिवाशांनी दौडीचे भव्य स्वागत केले. यानंतर दौडीचे कडोलकर गल्लीत जागोजागी देखावे उभारुन स्वागत करण्यात आले. यानंतर दौड केंचापूर गल्लीत आली असता केंचापूर गल्लीच्या ठिकाणी भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले होते. या ठिकाणी केंचापूर गल्लीतील रहिवाशांनी दौडीचे फटाक्यांच्या आतषबाजीत तोफेंच्या सलामी देत दौडीचे स्वागत केले. सुवासिनीनी ध्वजाला ओवाळून गल्लीत प्रवेश दिला. संपूर्ण गल्लीत शिवकालीन देखावे निर्माण करण्यात आले होते. संपूर्ण गल्लीत रांगोळ्या, पताका आणि तोरणानी सजवली होती. घरोघरी ध्वजाची आरती करण्यात आल्यानंतर गणेश मंदिराजवळ आरती करण्यात आली. यानंतर उभारलेल्या व्यासपीठावर दौडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, निरंजन सरदेसाई यांनी दौडीत सहभागी झालेल्या धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रेरणा मंत्राने दौडीची सांगता झाली.









