गावोगावी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने आयोजन : तरुणांमध्ये नवचैतन्य : दौडच्या माध्यमातून एकीचा संदेश
वार्ताहर /किणये
तालुक्यात रविवारपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. गावागावांमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने दुर्गामाता दौडला मोठ्या जल्लोषात सुरुवात करण्यात आली आहे. रविवारी पहाटे निघालेल्या या दुर्गामाता दौडमध्ये गावागावांमध्ये नमचैतन्य निर्माण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय भवानी जय शिवाजी… अशा घोषणा या दुर्गामाता दौडमध्ये देण्यात आल्या. गावांच्या प्रत्येक गल्ल्यांमध्ये आकर्षक अशा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच भगवे फेटे आणि भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. यामुळे वातावरण भगवेमय झाले होते. गावागावांमधील ग्रामदैवताच्या मंदिरात शस्त्रपूजा करून दुर्गामाता दौडला प्रारंभ करण्यात आला. यावेळी दुर्गामाता दौडचे महत्त्व याबद्दल अनेक मान्यवरांनी भाषणेही केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित काही ठिकाणी मार्गदर्शनपर भाषणे झाली. गावागावांमध्ये सुरू असलेल्या या दौडचे चौकांमध्ये व गल्लीच्या कोपऱ्यांवर जल्लोषात स्वागत करण्यात येत होते. काही ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येत होती. महिला आरती ओवाळून या दौडचे स्वागत करीत होत्या.
सावगावमध्ये दुर्गामाता दौड
सावगाव गावात दुर्गामाता दौडला रविवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला आहे. गावातील महालक्ष्मी मंदिरात विधिवत पुजा करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजा करून दुर्गामाता दौडला प्रारंभ करण्यात आला. शिवस्मारकात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र म्हणण्यात आले. तरुणांनी पांढरे कुर्ते परिधान केले होते. घरोघरी महिला दौडीचे स्वागत करीत होत्या. या दौडमध्ये गावातील तरुणीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मच्छे, नावगे व पश्चिम भागात भागातील विविध गावांमध्ये दुर्गामाता दौडला सुरुवात करण्यात आली आहे.
सुळगा( हिं.) येथे दुर्गामाता दौड
वार्ताहर /उचगाव : सुळगा( हिं.) येथील दुर्गामाता दौडला युवक व युवतींच्या भरघोस उपस्थितीत आणि उत्साही वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज की जय… जय शिवाजी जय भवानी… दुर्गा माता की जय हो… अशा जयघोषामध्ये शुभारंभ करण्यात आला. प्रथम लक्ष्मी गल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर गावातील सर्व धारकरी, युवक, युवती जमल्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत शिवरायांच्या मूर्तीचे पूजन दुर्गामाता दौडचे प्रमुख शेखर पाटील व उपप्रमुख विक्रम जाधव यांच्या हस्ते पूजन करून या दौडचा शुभारंभ करण्यात आला. ही दौड लक्ष्मी गल्ली, ब्रह्मलिंग गल्ली, देशपांडे कॉलनी, गणपत गल्ली, धर्मवीर संभाजी गल्ली, मरगाई गल्ली, वेंगुर्ला मेन रोड, कोवाडकर कॉलनी, मारुती गल्ली, छत्रपती शिवाजी गल्ली, मसणाई गल्लीमधून काढण्यात आली. अखेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर या दौडची सांगता करण्यात आली. दौडमुळे युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले.भगव्या पताका, रांगोळ्या व सुवासिनींकडून दौडचे औक्षण करून पूजन करण्यात येत होते.
कल्लेहोळ : दुर्गामाता दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्लेहोळ येथील छत्रपती शिवाजी युवक मंडळ यांच्या विद्यमाने दुर्गामाता दौडला रविवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती प्रांगणातून शुभारंभ करण्यात आला. या दौडचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आले. यानंतर सुळगा ग्रामपंचायतचे माजी सदस्य सुभाष मरूचे, अनिल पाटील, पिराजी वेताळ व सुरज पाटील यांच्या उपस्थितीत पूजनाचा कार्यक्रम पार पडला. आणि दुर्गामाता दौडला प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय… दुर्गामाता की जय… जिजामाता की जय… अशा घोषणा देत युवक, युवती या दौडमध्ये सहभागी झाल्या होत्या. गावामध्ये संपूर्ण गल्ल्यातून रांगोळी टाकून व भगव्या पताका, नारळाच्या डहाळी बांधून सजावट करण्यात आली होती. घरोघरी सुवासिनांकडून या दुर्गामाता दौडच्या ध्वजाचे पूजन करण्यात येत होते. ध्वजाचा मान रविवार दि. 15 रोजी सुरज पाटील यांना देण्यात आला होता. संपूर्ण गावातून ही दौड काढून दौडची सांगता विठ्ठल गल्लीतील विठ्ठल मंदिरापाशी करण्यात आली. सोमवार दि. 16 रोजी कलमेश्वर गल्लीतील युवकांचा हा ध्वजाचा मान असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपासून या दुर्गामाता दौडचा शुभारंभ होईल आणि कलमेश्वर मंदिरामध्ये याची सांगता होणार आहे. रविवारी झालेल्या या दुर्गामाता दौंडमध्ये छत्रपती शिवाजी युवक मंडळाचे सर्व कार्यकर्ते, गावातील युवक, युवती, लहान बालके यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
उचगावात भगवेमय वातावरण
आम्ही गड्या उचगावचे राहणार.. चाकर शिवबाचे होणार… तुमचे आमचे नाते काय जय भवानी जय शिवराय… बोल बजरंग बली की जय… अशा घोषणा, मार्गावर फुलांचा सडा, रांगोळ्या, भगव्या पताका, भगवी, पांढरी शुभ्र वस्त्रs, परिधान करून भगव्या ध्वजाची आरती करणाऱ्या महिला अशा भगवेमय वातावरणात उचगाव परिसरातील उचगाव, कोनेवाडी, बसुर्ते, तुरमुरी, अतिवाड, कल्लेहोळ, सुळगा या गावांमध्ये रविवारी दुर्गामाता दौड उत्साही वातावरणात काढण्यात आली. उचगाव येथील मध्यवर्ती गांधी चौकातील गणेश विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या प्रांगणात सर्व युवक, युवती जमा झाले आणि सहा वाजता दुर्गामाता दौंडला प्रारंभ झाला. यावेळी गणपत गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मळेकरणी देवस्थान मार्ग, चव्हाट गल्ली, लक्ष्मी गल्ली, अनगोळ गल्ली, आंबेडकर नगर, मारुती गल्ली, नागेशनगर अशा विविध भागांमध्ये या दौडीचे प्रस्थान झाले आणि पुन्हा गणेश विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात ध्येयमंत्र, प्रेरणा मंत्र होऊन या पहिल्या दिवशीच्या दुर्गामाता दौडची सांगता झाली. यावेळी उचगाव प्रमुख नेहल जाधव, उचगाव विभाग प्रमुख मिथिल जाधव तसेच दुर्गामाता दौड शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. या दौडीमध्ये लहान बालकांपासून मोठ्यांपर्यंत युवकांनी व बालकांनी आपला सहभाग या दुर्गामाता दौडमध्ये दर्शविला होता.
सांबरा येथे दुर्गामाता दौडीला उत्साहात प्रारंभ
वार्ताहर /सांबरा : सांबरा येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री दुर्गामाता दौडला रविवारी उत्साहात प्रारंभ झाला. येथील दौडीचे यंदाचे हे 21 वे वर्ष असून दौडमध्ये पहिल्याच दिवशी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. प्रारंभी येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये अश्वारूढ शिवमूर्तीचे पूजन ग्रा पं उपाध्यक्ष मारुती जोगानी व देवस्थान कमिटीचे सदस्य सिद्राई य•ाr यांनी केले. मूर्तीजवळील ध्वजपूजन इराप्पा जोई यांनी केले. चौथरा पूजन राहुल गावडे यांनी केले तर शस्त्रपूजन शंकर य•ाr, पुंडलिक जत्राटी, विक्रम सोनजी, नितीन देसाई व मल्लाप्पा कांबळे यांनी केले.दौडमधील भगव्या ध्वजाचे पूजन ग्रा. पं. अध्यक्षा रचना गावडे यांनी केले. त्यानंतर प्रेरणामंत्राने दौडीला सुरुवात झाली. ग्रा. पं. अध्यक्षा रचना गावडे या स्वत: भगवा ध्वज घेऊन दौडीमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर दौड मार्गस्थ झाली. दौड निघणाऱ्या मार्गावर महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. तर गल्लोगल्ली भगव्या पताका व भगवे ध्वज लावण्यात आले होते. त्यामुळे अवघे गाव भगवेमय बनले होते. दौडमध्ये विविध देवदेवतांच्या घोषणा देत स्फूर्तीगीते गाण्यात येत होती. दौड मारुती गल्ली, लक्ष्मी गल्ली, भैरू देव मंदिर, शुक्रवार पेठ, मंगळवार पेठ, महात्मा फुले गल्ली, गणेशनगर, महादेव नगरमध्ये जाऊन मेन रोडवरील मातंगी मंदिरसमोर आल्यानंतर ध्येयमंत्राने दौडीची सांगता करण्यात आली. दौडीमध्ये लहान मुलांसह मुलींची संख्याही लक्षणीय होती.









