शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा निर्णय : दौडच्या मार्गाविषयी सखोल चर्चा
बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव विभागाच्यावतीने नवरात्रोत्सवात भव्य दुर्गामाता दौड काढली जाणार आहे. सध्या बेळगावसह उत्तर कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये दुर्गामाता दौड काढली जात आहे. परंतु संपूर्ण राज्यभर दुर्गामाता दौड काढली जावी, यासाठी प्रचार व प्रसार केला जाणार असल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे कर्नाटकचे प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी सोमवारी आयोजित बैठकीत दिली. अनसुरकर गल्ली येथील छत्रेवाडा येथे झालेल्या बैठकीमध्ये दुर्गामाता दौडविषयी सविस्तर चर्चा झाली. कर्नाटकात विभागवार प्रचारक नेमण्यासंदर्भात माहिती देण्यात आली.
यावेळी दुर्गामाता दौडवेळी गायिल्या जाणाऱ्या गीतांच्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले. मराठी व कन्नड अशा दोन्ही भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध असून यामधीलच स्फूर्तीगीते दौडवेळी म्हणावी लागणार आहेत. 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान दुर्गामाता दौड काढली जाणार आहे. यावर्षी 11 दिवस दौड काढली जाणार असल्याने मार्गामध्ये काहीसा बदल करण्यात आला आहे, याची माहिती धारकऱ्यांना देण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुका प्रमुख परशुराम कोकितकर, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, प्रचारक हिरामणी मुचंडीकर, किरण बडवाण्णाचे, चंद्रशेखर चौगुले, विनायक कोकितकर यासह मोठ्या संख्येने धारकरी उपस्थित होते.
बेशिस्तपणावर होणार कारवाई
दुर्गामाता दौडला दरवर्षी मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे 25 ते 40 हजार शिवप्रेमी दुर्गामाता दौडमध्ये सहभागी होतात. यादरम्यान काही जणांकडून बेशिस्तपणाचे वर्तन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशांवर यापुढे कारवाई केली जाणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच दौडमध्ये कोणत्याही चुकीच्या घोषणा दिल्या जाणार नाहीत, याचीही खबरदारी घेतली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.









