शहरात भगवे वादळ : मराठा लाईट इन्फंट्री जवानांचा दौडमध्ये सहभाग : कॅम्प येथे दौडचे जोरदार स्वागत
बेळगाव : उराउरात देव, देश आणि धर्माच्या रक्षणाची ज्योत पेटविणाऱ्या दुर्गामाता दौडला तिसऱ्या दिवशीही तुफान प्रतिसाद मिळाला. देशाचे रक्षण करणाऱ्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी या दौडमध्ये सहभागी होऊन तरुणाईला देशसेवेचे धडे दिले. बुधवारी कॅम्प येथे दुर्गामाता दौडीचे जल्लोषात स्वागत झाले. त्यामुळे पुन्हा एकदा शहरात भगवे वादळ दिसून आले. तिसऱ्या दिवशीच्या दौडला मिलिटरी महादेव मंदिरापासून प्रारंभ झाला. मिलिटरी महादेव येथील महादेवाची आरती करण्यात आली. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी व सुभेदार मेजर संदीप खोत यांच्या हस्ते आरती करून दौडचा ध्वज चढविण्यात आला. यावेळी पं. एस. के. पाठक तसेच लष्करी अधिकारी उपस्थित होते. ग्लोब टॉकीज रोड येथून छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, कॅम्प येथील प्रमुख मार्गांवर दौडचे जोरदार स्वागत करण्यात आले. कॅम्प येथून जत्तीमठ येथील दुर्गादेवी मंदिरात दौडची सांगता झाली. दुर्गामाता दौडचे ज्येष्ठ धारकरी बसवंत नाईक तसेच वडगाव विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण यांच्या हस्ते आरती करण्यात आली. ध्येयमंत्रानंतर ध्वज उतरविण्यात आला.
आज शहापूर येथे बैठक
रविवारी होणाऱ्या शहापूर विभागातील दुर्गामाता दौडच्या संदर्भात गुरुवारी रात्री ठीक 8 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. लक्ष्मीनगर, नाथ पै सर्कल येथील श्री महागणपती मंदिरात बैठक होणार असून यावेळी शहापूर विभागातील शिवभक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुर्गामाता दौडचा उद्याचा मार्ग
शुक्रवार दि. 26 रोजी खासबाग येथील दुर्गामाता मंदिरापासून दौडला प्रारंभ होणार आहे. भारतनगर पहिला क्रॉस, नाथ पै सर्कल, डबल रोड, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, मरगम्मा मंदिर रोड, भारतनगर, भारतनगर 4, 5 आणि 6 वा क्रॉस, रयत गल्ली, ढोरवाडा, सप्पार गल्ली, रथ गल्ली, सोनार गल्ली, वडगाव मेन रोड, बाजार गल्ली, मारुती मंदिर, तेग्गीन गल्ली, जुने बेळगाव रोड, गणेशपेठ गल्ली, कुलकर्णी गल्ली, कोरवी गल्ली, संभाजी गल्ली, लक्ष्मी मंदिर, लक्ष्मी गल्ली, बस्ती गल्ली, खन्नुकर गल्ली, चावडी गल्ली, रामदेव गल्ली, येळ्ळूर रोड, नाझर कॅम्प, क्रॉस नं. 3, हरिजन वाडा, हरिमंदिर, विठ्ठल मंदिर, वझे गल्ली, धामणे रोड, विष्णू गल्ली, कारभार गल्ली, आनंदनगर, पाटील गल्ली, संभाजीनगर, पाटील गल्ली, मंगाई मंदिरात दौडची सांगता होईल.









