वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
दुर्गा माता की जय, जय भवानी जय शिवाजी..असा जयघोष करत सोमवारी घटस्थापनेपासून अलतगे येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धारकरी व ग्रामस्थ यांच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे दुर्गामाता दौडला मोठ्या जल्लोषी वातावरणात प्रारंभ करण्यात आला. दौडमध्ये धारकऱ्यांबरोबर बालचमू व शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे चित्र दिसून आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती पूजन, दुर्गामाता मूर्ती पूजन, शस्त्र पूजन व ध्वजपूजन करून प्रेरणा मंत्राने व आरती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर दौडला सुरुवात करण्यात आली. दौडमुळे गावामध्ये नवचैतन्य व शिवमय वातावरण तयार झाल्याचे दिसून येत आहे. दौडला ठिकठिकाणी गावातील सुवासिनींनी आरती ओवाळून स्वागत करत असल्याचेही चित्र दिसून येत आहे. या दौडच्या वेळी धारकऱ्यांना सामजिक बांधिलकी जपत शिवप्रेमींकडून अल्पोपाहार देण्यात येत आहे.









