शिवभक्तांची उपस्थिती : शहरात भगवेमय वातावरण : अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्याकडून मार्गदर्शन
बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने काढण्यात आलेल्या भव्य दुर्गामाता दौडला यावर्षीही तुफान प्रतिसाद मिळाला. विजयादशमी दिवशी हजारोंच्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते. धर्म व संस्कृती टिकवण्यामध्ये युवापिढी कुठेही कमी पडणार नाही, हे पुन्हा एकदा युवकांनी ठासून सांगितले. देव, देश आणि धर्माचा हा लढा यापुढेही असाच सुरू राहील, असा निश्चय करून युवकांसह युवतीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे शहरात भगवेमय वातावरण दिसून आले.
गुरुवारी झालेल्या दौडची सुरुवात मारुती गल्ली येथील मारुती मंदिरापासून झाली. शिवव्याख्याते सौरभ करडे यांच्या हस्ते आरती करून ध्वज चढविण्यात आला. मारुती गल्ली, देशपांडे गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, कोनवाळ गल्ली, केळकर बाग, समादेवी गल्ली, कंग्राळ गल्ली, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली आदी भागात दुर्गामाता दौडचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमा तसेच सजीव देखावे शिवप्रेमींचे लक्ष वेधून घेत होते.
राहुल सोलापूरकर यांचा सत्कार
धर्मवीर संभाजी चौक येथील शंभूतीर्थ येथे दौडची सांगता झाली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला सिनेअभिनेते व व्याख्याते राहुल सोलापूरकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रांतप्रमुख किरण गावडे, जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, शहरप्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते राहुल सोलापूरकर यांचा सत्कार करण्यात आला. तर तालुकाप्रमुख परशराम कोकितकर, वडगाव विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण यांच्या हस्ते सौरभ करडे यांचा सत्कार झाला.
व्याख्यानातून स्वराज्याचे महत्त्व स्पष्ट
अभिनेते व व्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी इतिहासातील अनेक दाखले देत स्वराज्याचे महत्त्व स्पष्ट केले. हिंदुस्थानात अनेक आक्रमणे झाली. हिंदूंची मंदिरे लुटली गेली. परंतु, कोणत्याही राज्यकर्त्याला हे थांबवावे असे वाटले नाही. केवळ महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या माँ जिजाऊंना वाटले की, हे प्रकार थांबले पाहिजेत. याच नवरात्रीच्या दिवसात आई तुळजा भवानीकडे त्यांनी नवस केला. यवनांचा नाश करणारा पुत्र मला जन्माला दे आणि तेच मागणं मागण्यासाठी आज शिवप्रेमी दहा दिवस दुर्गामाता दौडमध्ये सहभागी होत आहेत. येथील शिवप्रेमींचा उत्साह पाहून मन थक्क होते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी सर्व धारकऱ्यांचे कौतुक करून मार्गदर्शन केले. जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी आभार मानले. मान्यवरांच्या हस्ते ध्वज उतरवण्यात आला. यावर्षी दुर्गामाता दौडमध्ये ध्वजासाठी लागणाऱ्या चांदीच्या काठीऐवजी पारंपरिक काठी वापरण्यात आली. दरवर्षी काठी देणाऱ्या व्यक्तींनी यावर्षी ती न दिल्याने पारंपरिक पद्धतीने ध्वज चढविण्यात आला होता.
बेळगावची दुर्गामाता दौड संपूर्ण देशामध्ये विशेष
शिवव्याख्याते सौरभ करडे म्हणाले, बेळगावची दुर्गामाता दौड ही संपूर्ण देशामध्ये विशेष असते. हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी दुर्गामाता दौडमध्ये सहभागी होत असतात. याच उत्साहाने गडकोट मोहीम तसेच 32 मण सुवर्ण सिंहासन निर्माण करण्यामध्ये सहभागी झाले पाहिजे. देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठीची ही मोहीम आपण आपल्या खांद्यावर घेणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.









