तरुण-तरुणींचा लक्षणीय सहभाग : बेळगुंदीत जल्लोषात दुर्गामाता दौड
वार्ताहर/किणये
तालुक्यात नवरात्रोत्सवानिमित्त सोमवारपासून मोठ्या उत्साहात व जल्लोषात दुर्गामाता दौड सुरू करण्यात आली आहे. दौडमुळे गावांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. तरुण व तरुणींचा दौडमध्ये लक्षणीय असा सहभाग दिसून येत आहे. पांढरे वस्त्र परिधान केलेली तरुणाई, हातात ध्वज, डोक्यावर गांधी टोपी, भगवे फेटे परिधान करून पहाटे गावागावांमध्ये दुर्गामाता दौड मोठ्या जल्लोषात काढण्यात येत आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशी या दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला दिसून आला.
मच्छे : येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान शाखा व विभागातर्फे ब्रह्मलिंग मंदिर येथून सोमवारी दुर्गामाता दौडला सुरुवात करण्यात आली. देवस्थान ग्रामस्थ पंच कमिटीतर्फे शस्त्र पूजा करण्यात आली. पंचांच्या हस्ते दौडचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दौड महादेव गल्लीतून निघाली. पाटील गल्ली व लक्ष्मी गल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोर दौडची सांगता झाली. मंगळवार दि. 23 रोजी पुन्हा ब्रह्मलिंग मंदिर येथून दौडला सुरुवात करण्यात आली. नेहरूनगर, भैरव नगर, नीलकंठेश्वर नगर, हनुमाननगर ,प्रभू श्रीराम कॉलनी, दत्त कॉलनी, आदी गल्ल्यामधून दौड निघाली व मारुती गल्ली येथे सांगता झाली.
बेळगुंदीत जल्लोषी वातावरण
बेळगुंदी गावात मोठ्या जल्लोषात दुर्गामाता दौड काढण्यात आली. दौडच्या प्रारंभी ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र कार्यकर्त्यांनी म्हटले. गावभर घरासमोर महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. दुर्गामाता दौडचे महिला आरती ओवाळून स्वागत करत होत्या. बस्तवाड, पिरनवाडी, नावगे, राकसकोप, मंडोळी, बेळवट्टी, किणये, रणकुंडये कर्ले, वाघवडे आदींसह तालुक्याच्या सर्रास गावांमध्ये दुर्गामाता दौड रोज पहाटे मोठ्या उत्साहात सुरू असतानाचे चित्र पहावयास मिळत आहे.









