वार्ताहर/कडोली
नवरात्री उत्सवानिमित्त जाफरवाडी येथे मोठ्या उत्साहात आणि जयघोषात सुरू असलेल्या दुर्गामाता दौडीमुळे गावात नवचैतन्य निर्माण झाले आहे. तरुण-तरुणींचा दौडमध्ये लक्षणीय सहभाग दिसून येत आहे. पांढरे वस्त्र परिधान केलेली तरुणाई, हातात ध्वज, डोक्यावर गांधी टोपी, भगवे फेटे परिधान करून पहाटे गावामध्ये दुर्गामाता दौड उत्साहात काढण्यात येत आहे. गामदैवत श्री बसवाण्णा मंदिरासमोर पूजन आणि ध्वजारोहन करून ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र झाल्यानंतर दुर्गामाता दौडीला प्रारंभ करण्यात येत आहे. बुधवारी सकाळी लक्ष्मण सामजी पाटील यांच्या हस्ते ध्वज पूजन, बाळकृष्ण भा. पाटील, पुष्पराज भरमा पाटील, शुभम गौंडाडकर, बंडू बेळगावकर, यांच्या यांच्या हस्ते शस्त्र पूजन करून दौडला प्रारंभ करण्यात आला. गावातील प्रमुख मार्गावरुन दौड जाऊन अभयनगर येथे सांगता करण्यात आली.









