गावागावांमध्ये दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद : बालचमूंचा सहभाग लक्षणीय
वार्ताहर/किणये
संपूर्ण तालुक्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित दुर्गामाता दौडच्या माध्यमातून आध्यात्मिक जागर होत आहे. शिवरायांचा जाज्ज्वल इतिहास युवापिढीपर्यंत पोहोचावा, गावच्या एकात्मतेसाठी ही दुर्गामाता दौड महत्त्वाची ठरत आहे. दौड तरुणाईंसाठी प्रेरणादायी ठरत आहे, असे प्रतिपादन खादरवाडी येथील राकेश पाटील यांनी केले. खादरवाडी येथे दुर्गामाता दौड उत्साहात काढण्यात आली. शिवाजी महाराज चौक येथून दौडला सुरुवात झाली. लष्करी जवान सुनील पाटील यांनी शिवरायांच्या मूर्तीचे पूजन केले. दौड ब्रह्मलिंग गल्ली, माळवी गल्ली मार्गे पाटील गल्ली येथे आली. तेथे दौडची सांगता करण्यात आली. दौडमध्ये गावातील धारकऱ्यांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. गल्ल्यागल्ल्यांमध्ये आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या.
सावगांव येथे दौड ठरली आकर्षक
येथे घटस्थापनेपासून दौड उत्साहात सुरू आहे. शुक्रवारी शिवस्मारक येथून दुर्गामाता दौडला सुरुवात झाली. प्रारंभी शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ध्येयमंत्र म्हणून जयघोष करत दुर्गामाता दौड निघाली. दौडमध्ये गावातील तरुणींनी मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या पोषाख परिधान केला होता. डोक्यावर गांधी टोपी व भगवे फेटे परिधान केले होते. काही मुलांनी शिवाजी महाराजांची व मुलींनी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा परिधान केली होती. त्यामुळे ही दौड आकर्षक ठरली. शिवस्मारकपासून पाटील गल्ली, विठ्ठल गल्ली, कलमेश्वर गल्ली, मरगाई गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली मार्गे छत्रपती शिवाजी महाराज गल्ली येथे या दौडची सांगता झाली. यावेळी गावातील युवा कीर्तनकार परशराम पाटील यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले.
कावळेवाडी येथे दौडचे जल्लोषात स्वागत
कावळेवाडी येथे दुर्गामाता दौडचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. गावच्या वेशीपासून दौडला सुरुवात झाली. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन संतोष सुतार व शस्त्र पूजन तेजस्विनी सुतार, ध्वज पूजन पूजा मोरे यांनी केले. दौड संपूर्ण गावभर फिरली. दौडचे महिला आरती ओवाळून स्वागत करत होत्या. दौडमध्ये बेळगुंदी, बिजगर्णी, बोकनूर, राकसकोप, सोनोली, यळ्ळेबैल येथील धारकऱ्यांचा सहभाग होता. कावळेवाडी येथील दुर्गादेवी उत्सव मंडळातर्फे दौड आल्यानंतर माजी जि. पं. सदस्य मोहन मोरे यांच्या हस्ते दुर्गामाता मूर्तीचे पूजन केले. त्यानंतर ध्येयमंत्र होऊन दौडची सांगता झाली.









