वृत्तसंस्था /काबूल
अफगाणिस्तानातील तालिबानच्या विजयामुळे प्रारंभी आनंदोत्सव साजरा करणाऱ्या पाकिस्तानचा आता भ्रमनिरास होऊ लागला आहे. तालिबानने 130 वर्षे जुनी पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा डूरंड लाइनच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अफगाणिस्तानचे संरक्षणमंत्री अन् तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा पुत्र मौलवी याकूब मुजाहिदने ही सीमा केवळ काल्पनिक रेषा असल्याचे उद्गार काढले आहेत. डूरंड लाइनचा मुद्दा अफगाणिस्तानचे लोक केव्हाही उपस्थित करू शकतात असे मुजाहिदने म्हटले आहे. 2021 मध्ये तालिबानने पाकिस्तानच्या सैन्याला सीमेवर कुंपण घालण्यापासून रोखले होते. अफगाणिस्तानकडून पाकिस्तानच्या हिस्स्यातील पश्तून क्षेत्रांवर दावा करण्यात येतो.
डूरंड लाइन
12 नोव्हेंबर 1893 रोजी ब्रिटिश राजवटीतील भारतासाठीचे सचिव सर मोर्टिमर डूरंड आणि अफगाणिस्तानचे तत्कालीन शासक अब्दुर रहमान खान यांच्यात हा सीमा करार झाला होता. 1947 पासून पाकिस्तान यालाच स्वत:ची सीमा मानतो. तर 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यापासून सर्वसामान्य लोकांना डूरंड रेषा ओलांडण्यास मनाई करण्यात आली आल्याने पश्तून लोक त्रस्त आहेत. पाकिस्तान सुरक्षा अन् तस्करी रोखण्याचे कारण देत 2640 किलोमीटर लांबीच्या डूरंड लाइनवर तारांचे कुंपण उभारू पाहत आहे.
अफगाणिस्तानचा दावा
डूरंड लाइन ही वसाहतवादी कालखंडात लादण्यात आलेली सीमारेषा असल्याचे अफगाणिस्तानचे मानणे आहे. या सीमेमुळे पश्तून समुदायाला दोन देशांमध्ये विभागते. ब्रिटिश अधिकारी आणि रहमान यांच्यातील कराराला 100 वर्षांची कालमर्यादा होती, जी 1993 मध्ये समाप्त झाली आहे. सुरक्षा अन् तस्करीच्या नावावर पाकिस्तान डूरंड लाइनला जागतिक स्तरावर स्थायी सीमेची मान्यता मिळवून देऊ पाहत असल्याचा अफगाणिस्तानचा आरोप आहे. तालिबान डूरंड लाइनच्या मुद्द्यावरून मागे हटण्याची शक्यता नाही. तालिबानकडून हिंसक विरोध होण्याची भीती पाकिस्तानला सतावत आहे. तालिबान सत्तेवर आल्याने डूरंड वाद कायमस्वरुपी शांत होईल अशी अपेक्षा पाकिस्तानला होती, परंतु पाकिस्तानला याप्रकरणी तालिबानकडून धक्का बसला आहे.









