क्रीडा प्रतिनिधी/ मडगांव
ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेत मैदानावर आणि मैदानाबाहेर सुधारणा होणे आवश्यक असल्याचे मत एफसी गोवाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी व्यक्त केले आहे.
2023 ड्युरँड चषकात एफसी गोवाचे आव्हान उपान्त्य फेरीत संपुष्टात आले. त्यांना कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर मोहन बागान सुपर जायंट एफसीकडून 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला. नोहा सदाउईने एफसी गोवाला आघाडीवर नेले तर जेसनने मध्यंतरापूर्वी मोहन बागानला बरोबरीत आणून ठेवले. या शंकास्पद पॅनल्टी निर्णयाद्वारे मोहन बागानला सामन्यात पुनरागमन करता आले.
सामना संपण्यापूर्वी काही मिनिटे शिल्लक असताना सादिक याने मोहन बागानला आघाडीवर नेले तरी पॅनल्टी एरियामध्ये चेंडू हाताळला गेल्याची तक्रारएफसी गोवाच्या खेळाडूंनी केली. मात्र, रेफ्रीनी त्यांचा दावा फेटाळला. दोन वादग्रस्त निर्णयाच्या बळावर मोहन बागान संघाने अंतिम फेरीत धडक मारली.
या सामन्याबद्दल बोलताना ड्यीरँड चषक फुटबॉल स्पर्धेत आयोजनामध्ये खूप सुधारणा आवश्यक असल्याचे मत एफसी गोवाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ सामन्यानंतर म्हणाले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधले.
रेफ्रींचे निर्णय शंकास्पद
ड्युरँड चषक सामन्यादरम्यान रेफ्र्राच्या संशयास्पद निर्णयांच्या वादग्रस्त मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यास स्पॅनियार्ड प्रशिक्षकाने संकोच केला नाही. भूतकाळातील समान समस्यांवर त्यांनी स्वत:च्या मार्गाने प्रकाश टाकला. भारतात खेळत असतो तेव्हा, आम्हाला अशा गोष्टींची सवय असते. आम्हाला माहित आहे की, गेल्या मोसमात एटीके मोहन बागानने बेंगलोर एफसीविरूद्ध पॅनल्टच्या आधारे आयएसएल ट्रॉफी जिंकली होती. अंतिम सामन्यात विजेत्या संघाला पॅनल्टी बहाल करण्याचा निर्णय योग्य नव्हता. यंदाच्या ड्युरँड चषकाच्या बाद फेरीत मुंबई सिटी एफसी आणि गुरूवारी एफसी गोवाविरूद्ध त्याचीच पुनरावृत्ती झाली. आतापर्यंत आम्हाला या परिस्थितीची कमी-अधिक सवय झाली होती. तुम्ही मोठे क्लब संघ असता त्यावेळी अशा गोष्टी तुम्हाला स्पोर्टिंगली घ्यावा लागतात असे मार्केझ म्हणाले.
नियमांचा विसंगत वापर
मार्केझ यांनी ड्युरँड संघ नोंदणी प्रक्रियेतील अनोख्या मुद्द्यांकडेही लक्ष वेधले. आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉलमधील कोणत्याही स्पर्धेत संघांनी त्यांच्या संघात 30 खेळाडूंची नोंदणी केली व ती संपूर्ण स्पर्धेत 30 राहिली पाहिजे. पण ही जगातील एकमेव अशी स्पर्धा आहे जिथे तुम्ही नंतर संघात आणखी खेळाडू सामावून घेतले तरीही काही फरक पडत नाही, असे एफसी गोवाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ म्हणाले.
ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघासमोरील लॉजिस्टिक आव्हानांचा मार्केझ यांनी उलगडाही केला. सामने अगदी जवळ येईपर्यंत आम्हाला वेळापत्रकात स्पष्टता येत नाही आणि म्हणून संघांना त्यांच्या पूर्ण ताकदीच्या संघांशी खेळायचे की नाही हे ठरवण्यासाठी वेळ लागतो. यासारख्या कारणांमुळे, ही स्पर्धा केवळ आशियातीरच नव्हे तर जगातही विलक्षण आणि प्रतिष्ठतेची असली, तरी ती आमच्या हंगामपूर्व तयारीचा एक भाग बनते, हे सुपर कप सारखेच आहे असे मानोलो म्हणाले.









