वृत्तसंस्था/कोलकाता
2024-25 च्या फुटबॉल हंगामातील प्रतिष्ठेच्या आणि सर्वात जुन्या अशा 133 व्या ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेला येथे शनिवार 27 जुलैपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत अ गटातील मोहन बागान आणि इस्ट बंगाल हे दोन बलाढ्या संघ आपले वर्चस्व ठेवण्यासाठी प्रयत्न करतील.
गेल्या वर्षी मोहन बागान संघाने या स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. बागानचा संघ पुन्हा यावर्षी हे जेतेपद स्वत:कडे राखण्यासाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेतील त्यांचा सलामीचा सामना डाऊनटाऊन हिरोज एफसी संघाबरोबर होणार आहे. या स्पर्धेत एकूण 24 संघांचा समावेश असून ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविली जाणार आहे. 24 संघ सहा गटात विभागण्यात आले असून प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील.
या स्पर्धेला तब्बल 133 वर्षांचा इतिहास असून देशातील ही सर्वात जुनी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आतापर्यंत मोहन बागान आणि ईस्ट बंगाल या दोन संघांनी सर्वाधिकवेळा अजिंक्यपद मिळविले आहे. या दोन्ही संघांचा अ गटात समावेश असून डाऊनटाऊन हिरोज एफसी व इंडियन एअरफोर्स एफसी या दोन्ही संघांचाही या गटात सहभाग राहिल. गेल्या वर्षी या स्पर्धेत मोहन बागान आणि इस्ट बंगाल यांच्यात जेतेपदासाठी लढत झाली होती. या स्पर्धेमध्ये सलग तिसऱ्यांदा हे दोन्ही संघ पुन्हा एकाच गटात यावेळी पहावयास मिळत आहेत. इस्ट बंगालने ही स्पर्धा विक्रमी 33 वेळा जिंकली असून मोहन बागानने 17 वेळा या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर होणार आहे. डाऊनटाऊन हिरोज संघाने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला आहे. हा संघ जम्मू-काश्मिर येथील असून 2020 साली या संघाची स्थापना करण्यात आली.









