वृत्तसंस्था / अबुधाबी
सध्या येथे सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत लंकन संघाने सलग तीन सामने जिंकून सुपर-4 फेरीतील आपले स्थान निश्चित केले. लंकन संघातील अष्टपैलु दुनिथ वेलालगे याच्या वडिलांचे निधन झाल्याने तो अफगाण विरुद्धचा सामना संपल्यानंतर मायदेशी परतला होता. वेलालगे पुन्हा या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांसाठी अबुधाबीत दाखल झाला आहे.
गुरूवारी अफगाण आणि लंका यांच्यातील ब गटातील सामना खेळविण्यात आला होता. या सामन्यात लंकेने विजय मिळविला. दुनिथचे वडील सुरंगा यांचे वयाच्या 54 व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. हा सामना संपल्यानंतर दुनित कोलंबोला रवाना झाला. आता या स्पर्धेत शनिवारी लंका आणि बांगलादेश यांच्यात सुपर-4 फेरीतील सामना खेळविला जाणार आहे. या सामन्यासाठी 22 वर्षीय दुनिथ परतला आहे. सुपर-4 फेरीमध्ये लंकेचा दुसरा सामना 23 सप्टेंबरला तर तिसरा सामना 26 सप्टेंबरला भारताबरोबर होणार आहे.









