बेळंकी रस्त्यावर दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी
मिरज : तालुक्यातील बेळंकी येथे बेळंकी-सलगरे रस्त्यावर डंपरखाली सापडून दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. तर अन्य एक दुचाकीस्वार जखमी झाला. भीमा बाळू माळी (वय ३५, रा. बेळंकी) असे त्याचे नाव आहे. तर दुसऱ्या दुचाकीवरील रामचंद्र सावंत हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातस्थळाचा पंचनामा करुन ग्रामीण पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अपघातानंतर डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, भीमा माळी आणि रामचंद्र सावंत हे दोन दुचाकीवरून सलगरेकडून बेळंकीकडे येत होते. ओव्हरटेक करणाऱ्या डंपरने भीमा माळी यांच्या दुचाकीला धडक दिल्याने ते डंपरच्या चाकाखाली गेले. डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. तर दुसऱ्या दुचाकीवरील रामचंद्र सावंत यांची दुचाकी रस्त्यालगतच्या शेतामध्ये पडल्याने अपघातातून बचावले. या अपघातामध्ये दोन्ही मोटरसायकलचे नुकसान झाले.।
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मिरज ग्रामीण पोलीस आणि महादेव रुग्णवाहिका यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनाचा अपघात झाल्याने मिरज-सलगरे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. मृत व्यक्तीवर मिरज शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. तर जखमीवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अपघातस्थळाचा पंचनामा करुन डंपर चालकाला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.








