दोडामार्ग :
दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात वाळू वाहतूक करणाऱ्या दोन डंपरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना सासोली हेदूस येथे रविवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. डंपरच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला स्थानिकांनी बाहेर काढले. अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून कौस्तुभ चंदन मयेकर (24, रा. कुडाळ) असे त्याचे नाव आहे. त्याला अधिक उपचारासाठी गोवा–बांबोळी येथे पाठविण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कुडाळ येथून दोन डंपर वाळू घेऊन दोडामार्गच्या दिशेने येत होते. हे दोन्ही डंपर ठराविक अंतर सोडून एकमेकांच्या पाठोपाठ होते. दोडामार्ग ते बांदा राज्य मार्गावरील सासोली हेदूस येथे डंपर आले असता डंपरच्या समोर अचानक एक दुचाकी आडवी आली. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात समोरील डंपरचालकाने ब्रेक मारला. मात्र, त्या पाठोपाठ असणाऱ्या कौस्तुभ मयेकर याच्या ताब्यातील डंपरची मागून धडक बसली. ही धडक इतकी जबर होती की अपघातानंतर मोठा आवाज झाला. तेथील स्थानिक व मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मागच्या डंपरचे केबिन पूर्णपणे चेपले गेले. तसेच समोरील डंपरमधील वाळूदेखील चंदनच्या ताब्यातील डंपरच्या केबिनमध्ये भरली. त्यामुळे कौस्तुभ आतच अडकून पडला. वेदनेने तो विव्हळत होता. हा प्रकार उपस्थितांच्या लक्षात येताच त्यांनी कौस्तुभला बाहेर काढले. त्याचा उजवा हात व पाय फ्रॅक्चर झाला. शिवाय त्याच्या डोक्यालाही दुखापत झाली. त्याला तात्काळ येथील ग्रामीण ऊग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला गोवा–बांबोळी येथे पाठविण्यात आले.
- अर्ध्या तासाने कौस्तुभला बाहेर काढण्यात यश
अपघातानंतर कौस्तुभला बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केले. मात्र, पूर्णत: चेपलेल्या केबिनमधून त्याला बाहेर काढणे उपस्थितांना अशक्य होऊ लागले. अखेर काहींनी पार, लोखंडी गज यांचा वापर करून केबिनचा पत्रा काहीसा सरळ केला. तब्बल अर्ध्या तासानंतर कौस्तुभला बाहेर काढण्यात उपस्थितांना यश आले.








