वृत्तसंस्था/ बेंगळूर
2023 च्या क्रिकेट हंगामाला येथे दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेने बुधवारी प्रारंभ झाला. या स्पर्धेतील चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू झालेल्या चार दिवसांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात खेळाच्या पहिल्या दिवशी उत्तर विभागाने नॉर्थ-इस्ट विभागाविरुद्ध पहिल्या डावात 6 बाद 306 धावा जमवल्या. उत्तर विभागाच्या ध्रृव शोरेने शानदार शतक (135) तर निशांत सिंधूने नाबाद अर्धशतक (76) झळकविले.
या सामन्यात नॉर्थ-इस्ट विभागाने नाणेफेक जिंकून उत्तर विभागाला प्रथम फलंदाजी दिली. उत्तर विभागाकडून खेळणारा दिल्लीचा सलामीचा फलंदाज ध्रुव शोरेने दमदार खेळी करत 211 चेंडूत 22 चौकारासह 135 धावा झळकवल्या. शोरेने चोप्रासमवेत पहिल्या गड्यासाठी 80 धावांची भागीदारी केली. या धावसंख्येवर उत्तर विभागाने पाठोपाठ दोन गडी गमवले. नॉर्थ-इस्ट विभागाच्या पी. जे. सिंगने चोप्राचा त्रिफळा उडवला. त्याने 6 चौकारासह 32 धावा जमवल्या. त्यानंतर पी. जे. सिंगने पुढच्या चेंडूवर कालसीला खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद केले. शोरेने प्रभसिमरन सिंगसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 59 धावांची भागीदारी केली. लेमतूरने प्रभसिमर सिंगला झेलबाद केले. त्याने 1 षटकार आणि 4 चौकारासह 31 धावा जमवल्या. संगमाने अंकित कुमारला 9 धावावर झेलबाद केले. उत्तर विभागाची स्थिती यावेळी 4 बाद 162 अशी होती. शोरे आणि निशांत सिंधू यांनी पाचव्या गड्यासाठी 80 धावांची भागीदारी केली. किशन सिंगाने शोरेला झेलबाद केले. किशन सिंगाने पहिल्या दिवशीचा खेळ संपण्यापूर्वी उत्तर विभागाचा कर्णधार जयंत यादवला खाते उघडण्यापूर्वी पायचित केले. दिवसअखेर निशांत सिंधू 2 षटकार आणि 9 चौकारासह 76 तर नारंग 3 चौकारासह 23 धावावर खेळत असून या जोडीने सातव्या गड्यासाठी अभेद्य 64 धावांची भागीदारी केली आहे. नॉर्थ-इस्ट विभागातर्फे किशन सिंगा आणि पी. जे. सिंग यांनी प्रत्येकी दोन तर दीपू संगमा आणि लेमतूर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. उत्तर विभागाने उपाहारापर्यंतच्या खेळात 34 षटकात 2 बाद 115 धावापर्यंत मजल मारली होती. दिल्लीच्या शोरेने 2022-23 च्या रणजी हंगामात सात सामन्यातून 859 धावा जमवल्या होत्या. अंधुक प्रकाशामुळे पंचांनी 3 षटके बाकी असताना खेळ थांबवला.
संक्षिप्त धावफलक : उत्तर विभाग प. डाव 87 षटकात 6 बाद 306 (ध्रुव शोरे 135, पी. चोप्रा 32, प्रभसिमरन सिंग 31, निशांत सिंधू खेळत आहे 76, पुलकित नारंग खेळत आहे 23, पी. जे. सिंग, किशन सिंगा प्रत्येकी 2 बळी, संगमा, लेमतूर प्रत्येकी एक बळी).









