बेळगाव : मॅजिक स्पोर्ट्स क्लब व अमोदराज स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने अमोदराज चषक 15 वर्षांखालील आंतरक्लब फुटबॉल स्पर्धेत उद्घाटन दिवशी डीयुएफसी, बिटा, ब्ल्यूलॉक संघांनी विजयी सलामी दिली. सेंट पॉल स्कूलच्या अॅस्ट्रोटर्फ मैदानावरती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून टेल्कोग्रुपचे टी. एस. सत्यनारायण, अमोदराज स्पोर्ट्सचे जितेंद्र पुरोहीत, मुकुंद पुरोहीत, स्पर्धा सचिव ऋषिकेश बंग आदी मान्यवर उपस्थित होते.
टी. एस. सत्यनारायण यांनी चेंडू लाथाडून व संघातील खेळाडूंची ओळख करुन स्पर्धेचे उद्घाटन केले. सदर स्पर्धेत 15 संघांनी भाग घेतला असून साखळी व बाद पद्धतीची स्पर्धा घेण्यात येणार आहे. उद्घाटनाच्या सामन्यात डीयुएफसी संघाने मॅजिक स्पोर्ट्स क्लब अ चा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात डीयुएफसीच्या प्रणीत सप्लेने एकमेव गोल केला. दुसऱ्या सामन्यात बिटा एफसीने रेग एफसीचा 1-0 असा निसटता पराभव केला. बिटाच्या प्रणवने एकमेव गोल केला. तिसऱ्या सामन्यात डीयुएफसीने बिटा संघाचा 3-0 असा पराभव केला. डीयुएफसीतर्फे अभय, ध्रुव, प्रणीत यांनी प्रत्येकी एक गोल केला.









