कोकरूड / संतोष पाटील :
शिराळा तालुक्यातील पश्चिम भागातील चांदोली धरणाच्या पायथ्याशी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. मात्र अवकाळी पावसामुळे या परिसरात शुकशुकाट दिसत आहे. पाऊस उघडला नाही तर पर्यटकांना पुढच्या वर्षीची वाट बघावी लागणार हे नक्की आहे.
काही कौटुंबिक सहली, मित्रांच्या पार्ष्या, गेट टुगेदर असो सगळी मंडळी आवर्जून चांदोलीचे ठिकाण पसंद करतात. गतवर्षीपेक्षा यावर्षी हजारो लोक चांदोलीला भेट देऊन गेल्याचे दिसत आहे. चांदोलीला ट्रिप घेऊन आलेली, ही सर्व मंडळी जेवणाची भांडी सोबत घेऊन धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या गर्द झाडीखाली चुली मांडून जेवणाची सुरुवात करतात. मग काय, दिवसभर हास्यविनोद, गप्पा गाण्यांच्या भेंड्या, कराओके साऊंडवर घोगऱ्या आवाजातील कानाला न सहन होणारी, गाण्याच्या बोलाचा आणि संगीताचा आजिबात पत्ता लागू न देता बेसूर आवाजात, किंचाळून ए.आर. रेहमान झालेले सिंगर म्हणजे काय बोलायचे. नुसती मज्जा, कोण नदीच्या पाण्यातून ओरडतोय, तर कोण झाडावर बसून गाण्याची साथ देतोय, तर कोण चुलीला जाळ लावता-लावता हातात, ग्लास घेऊन गाण्याची री ओढतोय.
भांड्यातील मटण, चिकन शिजलंय की नाही हे बघता-बघता रिकामा झालेला टोप पाहून उर्वरित मंडळींचा नुसता राडा, प्रत्येक झाडाखाली शिकावू आचार्यांनी मांडलेल्या चुली आणि आसमंतात उसळणारे धुराचे लोट, चुलीवर चिकन, मटण, सिक्स्टीफाय, मासा फ्राय आणि शाकाहारी जेवणाची मेजवानी सर्वत्र पहावयास मिळते. मटन खाल्लं की पाण्यात उडी, भूक लागली की पाण्यातून बाहेर उडी, दिवसभर नुसता राडा, बेभान होऊन शेवटी गाण्याची लावलेली वाट. हे असलं चित्र बघायचं तर फक्त चांदोलीत दिसेल.
शाळांना सुट्ट्या लागल्यापासून सर्व स्तरातील लोक बालचमूसहित संपूर्ण कुटुंब घेऊन चांदोलीच्या पायथ्याशी जमून निसर्गाचा आस्वाद घेताना दिसतात. जूनच्या १५ तारखेपर्यंत इथल्या चुली पेटत राहतात. अवकाळी पावसामुळे धरणाच्या पायथ्याशी अक्षरशः नुसता चिखल झाला असून आठ दिवसांपासून पावसाच्या कोसळधारा सुरू आहेत. त्यामुळे या ठिकाणी गर्दी पूर्णत: थांबली आहे. पाऊस नाही थांबला तर या ठिकाणी यायला पुढचे वर्ष उजाडणार हे नक्की आहे.








