मुख्यमंत्र्यांचे कायदा सल्लागार पोनण्णा यांचा वकिलांतर्फे सत्कार
बेळगाव : आम्ही सर्वांनी एकजुट दाखविली म्हणूनच आम्हाला संरक्षण कायदा लागू झाला. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षात राहू. मात्र वकील म्हणून सर्वांनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे. एकत्र असल्यामुळे आपल्या बरोबरच समाजाच्याही समस्या दूर करू शकतो. त्यासाठी एकत्र राहून समाजासाठी वकिलांनी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे कायदा सल्लागार ज्येष्ठ वकील आमदार पोनण्णा यांनी केले. वकिलांना संरक्षण कायदा लागू केल्याबद्दल बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने आमदार पोनण्णा यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या सत्काराला उत्तर देताना त्यांनी हे आवाहन केले आहे. चिक्कमंगळूर येथील घटनेनंतर संरक्षण कायद्याची गरज असल्याने राज्यातील संपूर्ण वकिलांनीच आंदोलन छेडले. त्यामुळे आज हा कायदा आम्हाला लागू झाला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कायदा मंत्री एच. के. पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले, असे त्यांनी सांगितले. बेंगळूर बार असोसिएशनचे अध्यक्ष विवेक सुब्बारे•ाr म्हणाले, संरक्षण कायद्यामध्ये बेळगावच्या वकिलांचे मोठे योगदान आहे. त्यांनी दाखविलेली कार्यतत्परता महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अॅड. दर्शन उपस्थित होते. त्यांनीही या कायद्याबाबतची माहिती दिली. तसेच कायद्याचा योग्य उपयोग वकिलांनी करून घ्यावा, असे त्यांनी सांगितले. बेळगाव बार असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष अॅड. सचिन शिवण्णावर, जनरल सेक्रेटरी गिरीराज पाटील व इतर वकिलांच्या हस्ते आमदार पोनण्णा, विवेक सुब्बारे•ाr, दर्शन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यातील विविध बार असोसिएशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही या सर्वांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते.









