हलगा-बस्तवाडच्या तरुणाला व्हिडिओ कॉलद्वारे ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न
बेळगाव : सायबर गुन्हेगारांचे कारनामे सुरूच आहेत. मोबाईलवरून व्हिडिओ कॉल करून तरुणांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढले असून रविवारी बस्तवाड-हलगा, ता. बेळगाव येथील एका तरुणाला ठकविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याच्या सतर्कतेमुळे ही फसवणूक टळली. रविवार दि. 4 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता बस्तवाड येथील एका तरुणाच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल आला. त्याने कॉल रिसिव्ह करताच पलीकडून एक तरुणी बोलत होती. क्षणार्धात बोलता बोलता ती विवस्त्र झाल्याचे दिसले. त्यामुळे या तरुणाने लगेच कॉल बंद केला. थोड्या वेळात फसवणुकीसाठी फोन कॉल सुरू झाले. आपण वरिष्ठ पोलीस अधिकारी आहोत. तुम्ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जे काही कृत्य केले आहे, त्याबद्दल तुमच्यावर कारवाई होणार आहे, अशी धमकी देण्यात आली. स्वत:ला त्याने राकेश अस्थाना आयपीएस असे सांगितले.
ज्या क्रमांकावरून बस्तवाड येथील तरुणाच्या मोबाईलवर कॉल आला, त्याचा डीपीवर आयपीएस अधिकाऱ्याचा फोटो होता. त्यामुळे बस्तवाडचा तरुण घाबरला. त्याने आपल्या काही नातेवाईकांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. तितक्यात पोलीस अधिकाऱ्याचा पुन्हा फोन आला. तुझा व्हिडिओ समाजमाध्यमावर अपलोड होणार आहे. तो करायचा नसेल तर 25 हजार रुपये आमच्या खात्यावर जमा कर, असे सांगितले. पोलीस अधिकाऱ्याने युट्यूबर म्हणून एकाचा मोबाईल क्रमांक दिला. घाबरलेल्या तरुणाने त्या क्रमांकावर संपर्क साधताच तुम्ही तरुणीशी केलेला व्हिडिओ कॉल आपल्याजवळ आहे. 25 हजार रुपये आपल्या खात्यावर जमा केला नाहीत तर सोशल मीडियावर तो व्हायरल करू, अशी धमकी देण्यात आली. फसवणुकीचा हा प्रकार असल्याचे तरुणाच्या लक्षात येताच त्याने गुन्हेगारांचा नंबर ब्लॉक केला. त्यामुळे त्याची फसवणूक टळली.









