सणासुदीचा काळ अन् स्पर्धा एकत्र आल्याचा मोठा लाभ हेणे शक्य : पर्यटन, वाहतूक, हॉटेल, अतिथीगृह व्यवसाय बहरणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
गुरुवारपासून प्रारंभ करण्यात आलेली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारताला घसघशीत आर्थिक लाभ मिळवून देणारी ठरणार आहे. या स्पर्धेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेत तब्बल 260 कोटी डॉलर्सची (20,800 कोटी रुपये) भर पडणार आहे. ही स्पर्धा 45 दिवस चालणार असून तिच्या निमित्ताने अनेक प्रवासी भारतात येणार असल्याने पर्यटन व्यवसाय बहरणार आहे. या स्पर्धेत एकंदर 48 सामने होणार असून ते 10 शहरांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. या शहरांमध्ये सामन्यांच्या वेळी भारताच्या इतर भागांमधून, तसेच विदेशांमधूनही अनेक क्रिकेट रसिक येणार आहेत. त्यांच्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात पैशांची आवक होणे शक्य आहे.
सणासुदीची भर
ही स्पर्धा ऐन सणासुदीच्या काळातच होणार आहे. त्यामुळे लोकांना सणांचा आणि क्रिकेटचा आनंद एकाचवेळी अनुभवायला मिळण्याची ही नामी संधी आहे. भारतातील आणि जगातील क्रिकेटप्रेमी ही संधी साधल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे पर्यटन व्यवसाय, वाहतूक व्यवसाय, हॉटेल आणि अतिथीगृहांच्या व्यवसाय आदींची भरभराट होईल, अशी अपेक्षा केली जात आहे. किरकोळ विक्री क्षेत्राला ही स्पर्धा विशेष लाभदायक ठरेल, असे मत अनेक अर्थतज्ञांनीही व्यक्त केले.
स्पर्धा पाहणाऱ्यांची संख्या वाढणार
मागच्या 2019 च्या स्पर्धेमध्ये टीव्ही आणि सोशल मीडिया यांच्यावरील प्रेक्षकांची संख्या 55.20 कोटी इतकी होती. यावेळी ही संख्या दुपटीहून अधिक वाढणार आहे. त्यामुळे टीव्ही प्रसारण अधिकारांच्या विक्रीतून मिळणाऱ्या रकमेतही मोठी वाढ होऊन ती 10,500 कोटी ते 12,000 कोटी इतकी असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. क्रिकेटच्या आनंदात लोक सणासुदीसाठीही अधिक खर्च करतील, ही शक्यता आहे, असे वित्त विभागाचे म्हणणे आहे.
महागाई वाढणार?
मात्र, हा लाभ होत असतानाच ही स्पर्धा आणि सण यामुळे महागाई वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मागणी वाढली की दर वाढविले जातात. स्पर्धा आणि सणवार यामुळे किरकोळ विक्री वस्तूंचे दर वाढविले जाण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. तरीही, लोक खरेदी निश्चितपणे वाढवतील ही शक्यता जास्त असल्याचे विविध अर्थतज्ञांचे म्हणणे आहे.
उत्साह वाढणार
विश्वचषक स्पर्धा आणि सणासुदीचा काळ यांचा संयोग झाल्याने सर्वसामान्यांच्या उत्साहालाही उधाण येण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या झाकोळानंतर भारतात होणारी ही सर्वात मोठी स्पर्धा असल्याने तिचा आनंद लुटण्यासाठी लोक आपला खर्च वाढविण्याची दाट शक्यता वित्तक्षेत्राला दिसून येत आहे.
कसा होणार लाभ…
- क्षेत्र किमान उत्पन्न कमाल उत्पन्न
- तिकीट विक्री 1,600 कोटी 2,200 कोटी
- टीव्ही अधिकार 10,500 कोटी 12,000 कोटी
- संघांवरील खर्च 1,500 कोटी 2,500 कोटी
- देशी, विदेशी पर्यटक 600 कोटी 850 कोटी
- इव्हेंट मॅनेजमेंट 750 कोटी 1,000 कोटी
- व्यापार 100 कोटी 200 कोटी
- प्रेक्षक खर्च 300 कोटी 500 कोटी
- प्रक्षेपण, खाद्यपदार्थ 4,000 कोटी 5,000 कोटी
- एकंदर 18,000 कोटी 22,000 कोटी









