रत्नागिरी :
पावसाळ्यात समुद्र खवळला की लाटांमधून किनारपट्टीवर मातीच्या रंगाची ‘फेणी’ म्हणजे फेस येण्यास सुरुवात होते. सध्या शहरानजीकच्या भाट्ये किनाऱ्यावर ही फेणी दिसू लागल्याने मान्सूनच्या आगमनावर शिक्कामोर्तब झाले आहे.
मान्सून सक्रिय झाला आणि वादळवाऱ्यानंतर समुद्र खवळला की गर्द पिवळसर रंगाचे फेसाळ पाणी लाटांबरोबर किनाऱ्यावर वाहत येते. त्याला स्थानिक मच्छीमार फेणी म्हणतात. या फेणीबरोबर काही मासे पुढे पुढे सरकत असतात. ही फेणी दिसू लागली की, पारंपरिक ‘पागी’ मच्छीमार किनाऱ्यावर पागताना दिसू लागतात. सध्या भाट्ये येथील किनाऱ्यावर असा फेणी दिसू लागली आहे. त्यात आता समुद्रही उधाणलाय व लाटांची उंची वाढली आहे. समुद्र उधाणल्यामुळे समुद्रातील पाणी खाली-वर अधिकाधिक उसळलेले पहायला मिळते. त्यामुळे समुद्रातील जीवांना पोषक खाद्य मिळते. त्यानंतर त्यांच्यात वाढ होते.
या काळात प्रजनन करणारे मासे हे खारफुटीजवळ अंडी घालण्यासाठी येतात. असे वेगवेगळे बदल पहायला मिळताल, असेही येथील जाणकार मंडळी सांगतात, मच्छीमारांसाठी यात नावीन्य वाटत नाही. समुद्रातील पाणी घुसळल्याने फेस येतो. पाण्याची घुसळण वाढते, त्यावेळी त्याचा मातकटपणा दिसतो. यामुळे लवकरच मान्सून पाऊस सक्रिय होणार याची वर्दी मिळते, असे येथील जाणत्या मच्छीमारांनी सांगितले.








