लक्ष्मी हेब्बाळकर यांची पत्रकार परिषदेत माहिती : 50 जणांवर लोकायुक्त धाडी टाकण्याचा प्रयत्न
बेळगाव : राज्यात व जिल्ह्यात काँग्रेसचा प्रचार जोमाने सुरू आहे. त्याला नागरिकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार यावे, अशी नागरिकांची इच्छा आहे. गृहलक्ष्मी, गृहज्योती, तरुणांना प्रोत्साहन धन, 10 किलो रेशन देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. काँग्रेसला वाढत चाललेला पाठिंबा पाहून भाजप हताश होऊ लागले आहे. त्यामुळे 50 जणांवर लोकायुक्त धाडी टाकण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला आहे. रविवारी सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात सविस्तर माहिती दिली. निवडणुका अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत असे असताना मी कोणत्याही चुकीच्या पद्धतीने वागलेले नाही, कार्य केलेली नाही, कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत. जनता आम्हाला साथ देत आहे. हे भाजप सरकारला बघवत नाही. राज्यात निवडणुकीच्या काळात अशा चुकीच्या पद्धतीने मतदारांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप जाणीवपूर्वक कटकारस्थान करीत आहे. मी काँग्रेसची प्रतिनिधी आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार सर्व कामकाज सुरू आहे. ग्रामीण मतदारक्षेत्रात प्रतिसाद चांगला मिळत आहे. माझा या परिस्थितीत वेळ वाया घालण्यासाठी व कार्यकर्त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी आमच्यावर इडीचा वापर भाजप करीत आहे. जिल्ह्यात तिघा जणांवर निशाणा साधण्यात आला आहे. या तिघांची नावे पत्रकारांनी विचारली असता हेब्बाळकर यांनी त्यांची नावे न सांगता जनतेचे ज्यांच्यावर अधिक प्रेम आहे अशा तिघांवर त्यांची वक्रदृष्टी आहे, असे सांगितले. राज्यात वातावरण बिघडविण्याचा हा प्रयत्न आहे, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. आम्ही कोणत्याही प्रकारची चूक केलेली नाही. केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी विरोधी पक्षाने हा मार्ग अवलंबला आहे, असे विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले. हट्टीहोळी यांना पत्रकारांनी काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार कोण? असा प्रश्न केला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, त्याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. पक्षाचे वरिष्ठ नेते व निवडून आलेले आमदार निर्णय घेतील. याबद्दल कोणीही कशाही पद्धतीची अफवा पसरू नये, असे सांगितले.









