पाणी, ड्रेनेज समस्यांनी जनता हैराण : नगरसेवक या समस्यांकडे लक्ष देणार का?
बेळगाव : मनपामध्ये बैठका घेण्यात येत आहेत. मात्र या बैठकांमध्ये विकासाबाबत निर्णय होत नसल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये वाद होत आहेत. काही नगरसेवक आणि स्थायी समितींचे अध्यक्ष अधिकाऱ्यांना लक्ष्य बनवत आहेत. त्यामुळे विकासाचा थांगपत्ताच नसल्याचे दिसून येत आहे. मनपातर्फे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत, असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र कोणत्याच योजना पूर्णत्वाला जात नसल्याचे चित्र आहे. महत्त्वाचे म्हणजे सत्ताधारी किंवा विरोधक असो मतभेद असले तरी विकासासाठी सर्वांनी एकत्रपणे काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. सभागृह अस्तित्वात येऊन वर्ष पूर्ण झाले. तरीदेखील मनपातील कामकाज सुरळीत होत नसल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या अर्थ आणि कर स्थायी समितीच्या बैठकीत बेकायदेशीर बांधकामाबाबत जोरदार चर्चा झाली. यावेळी अधिकाऱ्यांना लक्ष्य बनविण्यात आले. मात्र सध्या महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी पुरवठा सुरळीत करणे आहे. तेव्हा त्या प्रश्नाकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.
उन्हाचा तडाखा वाढत आहे. त्यामुळे विहिरी तळ गाठत आहेत. कूपनलिकांचे पाणीही कमी झाले आहे. त्यामुळे बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातील पाणी पातळीही झपाट्याने घटत आहे. त्यामुळे पाणी समस्या गंभीर बनली आहे. मात्र या प्रश्नासाठी कोणीच गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या आमदार फंडातून शहरातील काही कूपनलिकांची दुरुस्ती करण्यात आली आहे. जुन्या विहिरींची स्वच्छता तसेच खोदाई करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. मात्र, काही प्रभागातच हे काम सुरू आहे. इतर ठिकाणी मात्र अशा प्रकारची कोणतीच कामे हाती घेण्यात आली नाहीत. त्यामुळे त्या भागामध्ये पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. दरम्यान, ड्रेनेजची समस्या काही ठिकाणी निर्माण होत आहे. ड्रेनेजचे चेंबर ब्लॉक होऊन विहिरींमध्ये मिश्रीत होत आहे. त्यामुळे त्या भागामध्ये गंभीर समस्या बनू लागली आहे. आनंदनगर, समृद्धी कॉलनी, केशवनगर, अन्नपूर्णेश्वरीनगर या ठिकाणी उघड्यावर ड्रेनेजचे पाणी सोडले जात आहे. परिणामी परिसरातील विहिरींचे पाणी पूर्ण खराब झाले आहे. या प्रकारामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मात्र याबाबत मनपातील बैठकीत कोणतीच चर्चा झाली नाही. एकूणच शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष करत केवळ राजकारण केले जात आहे, असा आरोप जनतेतून होत आहे.









