मंडणगड :
आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट स्थितीतील कामामुळे पावसात विविध समस्या निर्माण झाल्याने महसूल प्रशासन, नगर पंचायत व स्थानिक ग्रामपंचायतीची धावपळ उडाली आहे.
महामार्ग प्राधिकरणाने अनेक ठिकाणी पावसाळ्यातील स्थिती लक्षात न घेता रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याने त्यांचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. रविवारी तालुक्यात २५० मिली मिटर इतक्या पावसाची नोंद झाली. शहरातील परिवार पार्क इथे रात्री रस्त्याच्या शेजारी गटार नसल्याने पाणी थेट रस्त्यावर आले. तेथून ते नागरिकांच्या घरात शिरले. तत्काळ नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीतच युद्धपातळीवर काम करुन आपत्कालीन परिस्थितीसाठी आम्ही तयार असल्याचे सिद्ध केले. महामार्गावर सर्वच अडचणीच्या ठिकाणी पाणी रस्त्यावर आल्याचे दिसले. पाचरळ-तुळशी-पालेसह मोऱ्यांची व पुलाची कामे सुरु असलेल्या सर्व ठिकाणी पावसाळ्यातील संभाव्य अडचणी लक्षात न घेता कामे अर्धवट सोडल्याने पाणी भरले. यामुळे दुचाकी व तीनचाकी वाहने पाण्यात अडकल्याने नागरिकांचे नुकसान झाले. तुळशी घाटात मोबाईल केबलसाठी खोदाई करण्यात आल्याने व रस्त्याच्या दुतर्फा गटार नसल्याने पाणी भरुन महामार्ग गायब झाला. दरम्यान शनिवार रात्रभर पडलेल्या धुर्वाधार पावसामुळे तालुक्यातील चिंचघर येथे संतोष भिकू पिंपळकर यांच्या घराचे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे फांदी पडून ९ हजारांचे नुकसान झाले. येथे – कोणतीही जीवितहानी झाली नाही. केळवत येथे सागर भोगले यांची पोल्ट्री शेड पावसात पडून ७० हजाराचे नुकसान झाले.








