जपान, चीनसह आशियाई बाजारांचा भारतीय बाजारावर प्रभाव : सेन्सेक्स 394 अंकांनी मजबूत
मुंबई
: भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील तिसऱ्या दिवशी बुधवारी व सलग दुसऱ्या सत्रात तेजीचा कल कायम राहिल्याचे दिसून आले. यामध्ये जागतिक पातळीवरील सकारात्मक कामगिरीचा लाभ हा बुधवारी भारतीय शेअर बाजारात झाल्याचे दिसून आले.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 393.69 अंकांनी वधारुन निर्देशांक 66,473.05 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बजाराचा निफ्टी दिवसअखेर 121.50 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 19,811.35 वर बंद झाला आहे.
जागतिक बाजारामधील तेजीच्या उत्साहामुळे गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक वाढवली आहे. याचा परिणाम म्हणून सेन्सेक्स 400 अंकांनी मजबूत झाला. यावेळी जेके टायर, हिरोमोटो कॉर्प, व्होडाफोन, विप्रो यांचे समभाग तेजीत राहिले. तर आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा यांचे समभाग मात्र नुकसानीत राहिले आहेत.
जागतिक बाजारांची दिशा
बुधवारी प्रामुख्याने जपान, चीन आणि हाँगकाँगसह अन्य आशियाई बाजारात तेजी राहिल्याने भारतीय बाजारात तेजीचा कल राहिला. या दरम्यान निफ्टीत बँक, निफ्टी मिडकॅप यांचे निर्देशांक 100 टक्क्यांनी मजबूत राहिले. तर निफ्टीत आयटी निर्देशांक मात्र प्रभावीत राहिल्याची नोंद केली आहे.
दिवसभरात 30 समभागांमध्ये 24 समभाग तेजीत राहिले. तर 6 समभाग हे नुकसानीत राहिले आहेत. यामध्ये जेके टायर 14.16 टक्के, मिश्र धातू 12.02, ओमॅक्स 9.98, व्होडाफोन 7.23, वेल्सपन इंडिया 6.05, अलेंबिक फार्मा 5.65 टक्क्यांनी मजबूत राहिले. तसेच स्टर्लिंग अॅण्ड विल्सन 4.99, बँक ऑफ बडोदा 3.31 टक्क्यांनी प्रभावीत झाले.
अमेरिकन अर्थव्यवस्थेत अमेरिकन बाँड यील्डमध्ये घसरण आणि इस्रायल व हमास यांच्यातील संघर्षामुळे जागतिक पातळीवर दबावाची निर्माण झाली आहे. तिचा परिणाम हा स्थानिक शेअर बाजारावर होत असून आगामी काळात याचा प्रभाव राहणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.









